२५ वर्षे ताबा, आता पुन्हा ६ वर्षांसाठी पुतिन सत्तेत? विरोधकच नसल्याने एकतर्फी निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 06:14 IST2024-03-18T06:14:37+5:302024-03-18T06:14:59+5:30
नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे.

२५ वर्षे ताबा, आता पुन्हा ६ वर्षांसाठी पुतिन सत्तेत? विरोधकच नसल्याने एकतर्फी निवडणुका
मॉस्को: रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकतर्फी निवडणुकांचे सोपस्कार पार पाडल्यानंतर आपल्या सुमारे २५ वर्षांच्या कारकिर्दीत आणखी ६ वर्षांची भर घालण्यास ते सज्ज झाले आहेत. नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे.
शुक्रवारपासून सुरू झालेली तीन दिवसीय निवडणूक कडक नियंत्रित वातावरणात पार पडली आहे. निवडणुकीत पुतिन किंवा युक्रेन युद्धावर कोणतीही सार्वजनिक टीका करण्याची परवानगी नव्हती. पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक ॲलेक्सी नवलनी तुरुंगात मरण पावले आणि इतर टीकाकार एकतर तुरुंगात किंवा निर्वासित आहेत. नवलनींच्या सहकाऱ्यांनी नाराज असलेल्यांना रविवारी दुपारी मतदानाला येऊन विरोध करण्याचे आवाहन केले होते.
टीका करण्यास मज्जाव
७१ वर्षीय पुतिन यांच्यासमोर क्रेमलिनधार्जिण्या पक्षांचे तीन प्रातिनिधिक प्रतिस्पर्धी निवडणूक रिंगणात होते. त्यांना पुतिन यांच्यावर युक्रेन युद्ध किंवा इतर कोणतीही टीका करण्यास मज्जाव होता. पुतिन यांनी प्रचारात रशियाच्या युद्धातील यशाबद्दल बढाई मारली.