Video: भरधाव फरारी बॅरियरला धडकली; प्रसिद्ध गेम डेव्हलपर विंस जैम्पेला यांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:27 IST2025-12-23T14:26:35+5:302025-12-23T14:27:16+5:30
विंस जैम्पेला यांनी ‘बॅटलफिल्ड’ आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी’सारखे प्रसिद्ध गेम तयार केले आहेत.

Video: भरधाव फरारी बॅरियरला धडकली; प्रसिद्ध गेम डेव्हलपर विंस जैम्पेला यांचा दुर्दैवी मृत्यू
Vince Zampella Death In Ferrari Crash: जागतिक कीर्तीचे व्हिडिओ गेम डेव्हलपर आणि ‘कॉल ऑफ ड्यूटी’ या लोकप्रिय गेमचे सह-निर्माते विंस जैम्पेला यांचे एका भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. कॅलिफोर्नियातील एंजल्स क्रेस्ट हायवेवर त्यांच्या फरारीचा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने विंस यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरियरला धडकली अन् लगेच कारला आग लागली. मृत्यूवेळी विंस 55 वर्षांचे होते.
इलेक्ट्रॉनिक आर्ट्सकडून निधनाची पुष्टी
व्हिडिओ गेमिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी इलेक्ट्रॉनिक आर्ट्स (EA) ने जैम्पेला यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. कंपनीने शोक व्यक्त करत म्हटले, हा अकल्पनीय तोटा आहे. विंस यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रांप्रती आणि त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती आमच्या संवेदना आहेत. व्हिडिओ गेम उद्योगावर विंस यांचा प्रभाव खोल आणि दूरगामी होता.
कारमधील दोघांचाही मृत्यू
स्थानिक प्रसारमाध्यम NBC4 च्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फरारी कारमध्ये दोन जण प्रवास करत होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. विंस जैम्पेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
HOLY SHIT friends
— Victoria Gonzalez (@VictoriaGo55816) December 23, 2025
This just hit me like a frag grenade...
Vince Zampella, the absolute LEGEND who co-created Call of Duty and built empires with Titanfall and Apex, gone at 55 in a brutal Ferrari crash up on Angeles Crest hwy
Dude was living the...pic.twitter.com/Vl8ZO58GHG
अपघाताचा व्हिडिओ समोर
अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात डोंगराळ भागातून वेगाने फरारी कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरियरवर आदळताना दिसते. धडकेनंतर कारला आग लागते.
विंस जैम्पेला यांचे योगदान काय?
विंस जैम्पेला यांच्या स्टुडिओने जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिडिओ गेम्सपैकी अनेक गेम विकसित केले. फर्स्ट-पर्सन मिलिटरी शूटर गेम्सच्या शैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. याच वर्षी त्यांचा गेम ‘बॅटलफिल्ड 6’ ने फ्रँचायझीच्या इतिहासातील विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
कोट्यवधी गेमर्सची पसंती
जैम्पेला यांच्या मास-कॉम्बॅट गेम्सने गेल्या दोन दशकांत विविध आवृत्त्यांमधून 10 कोटींहून अधिक गेमर्सची मने जिंकली. आजही ‘कॉल ऑफ ड्यूटी’ या गेमचे दरमहा 10 कोटींहून अधिक सक्रिय खेळाडू आहेत.
1990 च्या दशकापासून यशाचा प्रवास
1990 च्या दशकात शूटर गेम्समध्ये डिझायनर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जैम्पेला यांनी 2002 मध्ये इन्फिनिटी वॉर्ड या स्टुडिओची सह-स्थापना केली. 2003 मध्ये ‘कॉल ऑफ ड्यूटी’च्या लॉन्चमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर ॲक्टिव्हिजनने हे स्टुडिओ विकत घेतले. काही वादांनंतर त्यांनी कंपनी सोडली आणि 2010 मध्ये रेस्पॉन एंटरटेनमेंटची स्थापना केली, जी 2017 मध्ये इलेक्ट्रॉनिक आर्ट्सने अधिग्रहित केली. यानंतर ‘बॅटलफिल्ड’ फ्रँचायझीला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आधुनिक फर्स्ट-पर्सन शूटर गेम्स क्षेत्रात अधिक नाव कमावले.