Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:29 IST2025-07-22T18:27:54+5:302025-07-22T18:29:00+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
कराची: पाकिस्तानमधूनऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात एका जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात १४ जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुण आणि तरुणीने कुटुंबाविरोधात जाऊन लग्न केले होते. दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये या घटनेबाबत संताप पसरला आहे. सामान्य लोकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडिओ
A Girl Shot dead by there family member #Balochistanincident#Balochistanpic.twitter.com/FJdhCN6VtD
— Darab_Muhammadi (@HasanDarab50815) July 21, 2025
व्हिडिओमध्ये काही लोक तरुण आणि तरुणीला कारमधून बाहेर ओढून एका निर्जन भागात घेऊन आल्याचे दिसते. यानंतर त्यांच्यावर पिस्तूलने अनेक गोळ्या झाडतात. यादरम्यान, तरुणी हल्लेखोरांना म्हणते, "तू फक्त मला गोळ्या मारू शकतोस. बस्स..." या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आणि महिलेची ओळख बानो बीबी आणि एहसानुल्लाह अशी आहे.
मुख्यमंत्री सरफराज बुगती काय म्हणाले?
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सोमवारी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, खोट्या अभिमानासाठी झालेल्या हत्येच्या या प्रकरणात १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर, सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी तरया आरोपींना प्राण्याची उपमा दिली.
याआधीही अशा घटना घडल्या
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अशीच घटना घडली होती. २०२३ मध्ये एका व्यक्तीने आपल्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने शिरच्छेद केला होता. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, पाकिस्तानात दरवर्षी खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोकांची हत्या केली जाते. आकडेवारीनुसार, महिला याचा सर्वाधिक बळी पडतात. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या मते, दरवर्षी खोट्या अभिमानाच्या नावाखाली येथे सुमारे एक हजार महिलांची हत्या केली जाते.