जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 08:29 IST2025-04-16T08:28:46+5:302025-04-16T08:29:29+5:30

Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला.

victor blaho videos 'I sat on the train for 46 hours, now let me go home; I'm done with visiting India!' | जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती आहे, असं आपण म्हणतो; पण आपल्याकडे आलेल्या अतिथींना आपण देतो ते अनुभव खरंच तेवढे छान असतात का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा अशा बातम्या सध्या चहुबाजूंनी कानावर येत आहेत. पुण्यातल्या सिंहगडावर आलेल्या एका परदेशी प्रवाशाला स्थानिक लोकांनी ‘मराठी भाषा शिकवतो’ असं म्हणत चक्क शिव्या शिकवल्या. त्याबाबतचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होताच हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.
 
त्यानंतर आता एका फ्रेंच पर्यटकाचा अनुभव समोर आला आहे. ‘इंडियन रेल्वे’चा प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुखकर असतो, असं म्हटलं जातं; पण एका फ्रेंच पर्यटकाने मात्र, ‘भारतात जाताय? मग रेल्वेचा प्रवास करु नका,’ असं थेट आवाहनच केलं आहे. 

व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. बास झालं भारत दर्शन, आपण आपलं गुपचूप आपल्या घरी परत जावं असं त्याला वाटलं. आपला हा अनुभव त्याने शेअर केला आहे आणि ‘भारतात फिरायला जाताय? सावधान...’ असा इशारा इतर परदेशी पर्यटक, प्रवाशांना दिला आहे. 

त्याबद्दलचा व्हिडीओ त्याने यूट्यूबवर अपलोड केला आहे. भारत भेटीवर आलेल्या व्हिक्टरने मुंबई ते वाराणसी, वाराणसी ते आगरा आणि आगरा ते दिल्ली असा तब्बल ४६ तासांचा रेल्वे प्रवास केला. स्लीपर कोचपासून ते थर्ड एसीपर्यंत रेल्वेच्या विविध ‘क्लास’मधून त्याने प्रवास केला. या प्रवासात काही फार सुंदर तर काही अत्यंत भयंकर अनुभव आल्याचं व्हिक्टरने म्हटलं आहे. दुर्दैवाने भयंकर अनुभवांचं पारडं अधिक जड असल्याचंही तो सांगतो.

भारतीय रेल्वेचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. या डब्यांमध्ये नुसता कलकलाट असतो, त्यामुळे प्रवासात अजिबात शांतता मिळत नाही,’ अशी तक्रार व्हिक्टरने केली आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये उंदीर, झुरळं दिसली. त्यामुळे आता मला भारतातल्या रेल्वे प्रवासाची किळस वाटते आहे, असंही त्याने सांगितलं आहे. 

रेल्वेचा प्रवास आणि स्वच्छता यांचा दुरान्वयेही संबंध नाही. सगळीकडे कचरा असतो, त्याचा घाण वास येतो असं सांगत त्याने नाक मुरडलं आहे. उंदीर आणि झुरळं तर सोडूनच द्या; पण रात्रीच्या वेळी शांत झोपू असं म्हणून भारतात तुम्ही रेल्वेच्या प्रवासाचा पर्याय निवडत असाल तर थांबा. इथे रेल्वेच्या डब्यांमध्ये माणसं नुसती उच्च आवाजात बोलत असतात. त्यामुळे प्रचंड गोंगाट असतो. लोक सतत इकडून तिकडे चालत असतात. मी एक मिनिटही शांत झोपू शकलेलो नाही, असं व्हिक्टर त्याच्या व्हिडीओमध्ये सांगतो. 

या सगळ्या अनुभवात भर म्हणून एका स्थानिक प्रवाशाने त्याला व्हिडीओ कॉलवरून आपल्या गर्लफ्रेंडशी बोलायला लावलं. त्याच्याबरोबर फोटो काढले. सतत त्याच्याशी गप्पा मारून त्याला वैताग दिला. ‘मला या सगळ्यांचा त्रास होतोय.  मला आता शांतता हवी आहे. मला घरी जायचंय. मला शांत झोपायचंय, मला स्वच्छ बेड हवाय, कलकलाट नकोय,’ असं म्हणत व्हिक्टरने आपल्या वैतागाला वाट मोकळी करून दिली आहे.
व्हिक्टरच्या या व्हिडीओवर आता भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे.

Web Title: victor blaho videos 'I sat on the train for 46 hours, now let me go home; I'm done with visiting India!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.