व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:04 IST2026-01-06T14:02:57+5:302026-01-06T14:04:31+5:30
Venezuela Oil Cost: डोनाल्ड ट्रम्प यांना व्हेनेजुएलातील लोकांची चिंता नसून, त्यांचा तेथील तेलावर डोळा आहे.

व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...
Venezuela Oil Cost: व्हेनेजुएलावरील अमेरिकेची कारवाई एका रात्रीत घडलेली नसून, पूर्वनियोजित होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यापासून, त्यांचा डोळा व्हेनेजुएलातील तेलावर होता. यानंतर निकोलस मादुरोंनी व्हेनेजुएलातील सत्ता हाती घेतल्यापासून, अमेरिकेने रणनीती आखण्यास सुरुवात केली. मादुरो ड्रग्सला प्रोत्साहन देतात, म्हणून आम्ही कारवाई केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. मात्र, तेथील तेलाच्या साठ्यासाठी ही कारवाई झाल्याचे संपूर्ण जगाला माहिती आहे.
ट्रिलियन डॉलर्सचा तेलखजिना
व्हेनेजुएलाकडे जगातील सर्वात मोठे कच्च्या तेलाचे साठे आहेत. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, एकूण तेल साठा सुमारे 303 अब्ज बॅरल आहे. $40 प्रति बॅरल दराने याची अंदाजे किंमत 12.12 ट्रिलियन डॉलर्स होते. ही रक्कम इतकी प्रचंड आहे ,की तिची तुलना अनेक देशांच्या संपूर्ण वार्षिक GDP शी करता येऊ शकते. उदाहरणार्थ, ही किंमत भारताच्या सध्याच्या GDP पेक्षाही तिप्पट, तर पाकिस्तानच्या GDP पेक्षा सुमारे 30 पट अधिक आहे.
ट्रम्प आणि तेलराजकारण
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा उघडपणे म्हटले होते की, व्हेनेजुएलाचे तेल चुकीच्या हातात आहे. त्यांच्या मते, मादुरो सरकार ही अमेरिकेच्या हितांसाठी अडथळा होती. त्यामुळेच आर्थिक निर्बंध, राजकीय दबाव आणि सत्तांतराच्या प्रयत्नांमागे एक मुख्य उद्देश व्हेनेजुएलाचे तेल अमेरिकन कंपन्यांसाठी खुले करणे, हा होता.
अमेरिकेला का हवंय व्हेनेजुएलातील तेल?
अमेरिकेचा लोभ केवळ स्वस्त तेलापुरता मर्यादित नाही. व्हेनेजुएलाचे तेल अमेरिकेसाठी एक भू-राजकीय शस्त्र ठरू शकले असते. यामुळे अमेरिका रशिया आणि ओपेक देशांविरुद्ध दबाव, जागतिक तेल किमतींवर प्रभाव आणि अमेरिकन डॉलरचे जागतिक वर्चस्व अधिक मजबूत करू शकते.
तेल उत्खननासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज
दरम्यान, व्हेनेजुएलातील बहुतांश तेलाचा प्रकार हेवी आणि एक्स्ट्रा-हेवी क्रूड आहे, ज्याचे उत्पादन खर्चिक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आहे. रिफायनरी, पाइपलाइन आणि वीजव्यवस्था पुन्हा उभी करण्याचे अमेरिकेपुढे आव्हान आहे. यामुळेच तेलसंपत्तीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ तात्काळ मिळणे शक्य नाही.
व्हेनेजुएला सर्वाधिक महागाई
गेल्या दोन दशकांपासून व्हेनेजुएला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची अर्थव्यवस्था जवळपास कोलमडली असून महागाईने विक्रमी पातळी गाठली आहे. 2018 मध्ये महागाई दर सुमारे 63,000%, तर 2025 मध्ये 500% होता. ही स्थिती केवळ आर्थिक अपयशाचेच नव्हे, तर चलन अवमूल्यन, उत्पादन ठप्प होणे आणि नागरिकांच्या जीवनमानावर झालेल्या भीषण परिणामांचे द्योतक आहे.
आर्थिक अपयशातून राजकीय अस्थिरता
कोणताही देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला की, त्याचा थेट परिणाम राजकीय स्थैर्यावर होतो. वेनेजुएलामध्येही तेच घडले. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अंतर्गत असंतोष, विरोधकांचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिका मानवाधिकारांचा मुद्दा पुढे करत प्रत्यक्षात व्हेनेजुएलाच्या तेलसंपत्तीवर डोळा ठेवून आहे.