ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:30 IST2025-02-02T19:29:01+5:302025-02-02T19:30:12+5:30
USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही.

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही
USA Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांची मैत्री सर्वश्रृत आहे. विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मैत्रीचे उदाहरण ठेवले आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो शनिवारी संध्याकाळपासून लागू झाला. मात्र यामध्ये भारताचे नाव नाही.
या निर्णयामुळे अमेरिका आणि या देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले असून, भविष्यात इतर देशांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावर 25% अतिरिक्त शुल्क लावला आहे. तर, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के शुल्क वाढवण्यात आला आहे. मात्र, कॅनडातून आयात होणाऱ्या तेलावर केवळ 10 टक्के शुल्क असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या करांच्या पहिल्या सेटमध्ये भारताचे नाव नाही.
दरम्यान, ट्रम्प सरकार लवकरच कॉम्प्युटर चिप्स, फार्मास्युटिकल्स, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, तेल आणि वायूच्या आयातीवर नवीन शुल्क लावण्याचा विचार करत आहे. युरोपीय देशांवरही असेच शुल्क आकारले जाऊ शकते. व्यापार तुटीमुळे अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेच्या व्यापार तुटीत चीनचा सर्वाधिक वाटा
रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम (RIS) नुसार, चीन, मेक्सिको आणि कॅनडा हे अमेरिकेच्या व्यापार तुटीत सर्वात मोठे योगदान देणारे आहेत. चीनचे योगदान 30.2 टक्के, मेक्सिकोचे 19 टक्के आणि कॅनडाचे 14 टक्के आहे, तर भारत या यादीत 9व्या क्रमांकावर आहे.
चीनने तीव्र निषेध नोंदवला
चिनी वस्तूंवर कर लादण्याच्या अमेरिकन आदेशाचा चीनने तीव्र निषेध नोंदवला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, ते जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल करणार असून, आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार आहेत. अमेरिकेने एकतर्फी शुल्क वाढ करणे हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे चीनी मंत्रालयाने म्हटले आहे .
कॅनडाचाही तीव्र विरोध
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफच्या विरोधात बदला म्हणून अनेक अमेरिकन आयातीवर 25% शुल्क लावेल. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे त्यांनाही गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. तर, मेक्सिकन अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनीदेखील अमेरिकन आयातीवर शुल्क लादण्याचा इशारा दिला.