अमेरिकेचा व्हेनेझुएलावर कब्जा; निकोलस मादुरो न्यूयॉर्कमध्ये अटकेत, डेल्सी रॉड्रिग्ज अंतरीम राष्ट्राध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 08:28 IST2026-01-04T08:26:51+5:302026-01-04T08:28:04+5:30
US strikes Venezuela news in Marathi: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मादुरो यांच्या हाताला बेड्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे.

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर कब्जा; निकोलस मादुरो न्यूयॉर्कमध्ये अटकेत, डेल्सी रॉड्रिग्ज अंतरीम राष्ट्राध्यक्ष
वॉशिंग्टन/काराकास: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक राजकारणात एका ऐतिहासिक आणि अत्यंत धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलावर थेट लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत लोकशाही पद्धतीने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिका सांभाळणार आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मादुरो यांच्या हाताला बेड्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे. मादुरो यांना एका अमेरिकन युद्धनौकेवरून अमेरिकेत नेण्यात आले. मादुरो यांना हेलिकॉप्टरने न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथे उतरवण्यात आले असून, तिथून त्यांना कडक सुरक्षेत ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (DEA) च्या कार्यालयात नेण्यात आले आहे. मादुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि 'नार्को-टेररिझम'चे गंभीर आरोप आहेत.
अंतरीम राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला विरोध
मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची 'अंतरीम राष्ट्राध्यक्ष' म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, रॉड्रिग्ज यांनी शपथ घेतली असून त्या अमेरिकेला सहकार्य करतील. मात्र, रॉड्रिग्ज यांनी सरकारी टीव्हीवर येत अमेरिकेला 'आक्रमणकारी' म्हटले आहे. त्यांनी मादुरो यांच्या सुटकेची मागणी केली असून, ते जिवंत असल्याचा पुरावा देण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी पहाटे २ च्या सुमारास काराकासमध्ये एकापाठोपाठ ७ मोठे स्फोट झाले. अमेरिकेच्या विमानांनी राजधानीतील महत्त्वाचे लष्करी तळ, विमानतळ आणि सरकारी इमारतींना लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिक दहशतीखाली रस्त्यावर उतरले होते. काराकासवर झालेल्या या भीषण हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हेनेझुएला सरकारने याला 'साम्राज्यवादी आक्रमण' म्हटले असून देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
ट्रम्प यांची घोषणा आणि मादुरोंवर आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत या यशस्वी मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी लष्करी कारवाई केली असून निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आले आहे." मादुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना न्यूयॉर्कमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.