"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:29 IST2026-04-10T20:26:33+5:302026-04-10T20:29:54+5:30
इराणचे परराष्ट्र राज्यमंत्री सईद खातिबजादेह यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून अमेरिकेच्या जहाजांना जाऊ देण्याबद्दल भूमिका मांडली.

"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने जो मुद्दा मांडला जात आहे, त्याच मुद्द्यावरून इराणने अमेरिकेला एक अट घातली आहे. इराणचे परराष्ट्र राज्यमंत्री सईद खातिबजादेह यांनी अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकता, फक्त त्यांनी शत्रूंसारखा व्यवहार करू नये, असे म्हटले आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार खातिबजादेह यांनी इराणी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा हा प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले की, "होर्मुझ सामुद्रधुनी खुली आहे. पण, काही तांत्रिक कारणांमुळे जहाजांनी इराणच्या लष्कराबरोबर संपर्क ठेवणे आवश्यक आहे."
"आम्ही होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गांवरून जहाजांच्या सुरक्षेची काळजी घेऊ", असेही ते म्हणाले.
...तर अमेरिका इराणला मदत करेन
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये वाटाघाटींची चर्चा होत आहे. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी इराणला एक सल्ला दिला आहे.
अमेरिकेहून पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी व्हान्स माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आम्ही चर्चा करण्यासाठी उत्साही आहोत. जर इराणने चांगल्या नियतीने काम केले तर अमेरिका मदतीचा हात देईल."
व्हान्स असेही म्हणाले, "इराणने जर आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर मग आमची भूमिका सकारात्मक असणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेसंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत."
इस्रायलच्या पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा कायम
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काही देशांना इशारा दिला आहे. नेतन्याहू म्हणाले की, "स्पेन आमच्या जवानांवर आणि संरक्षण दलावर खोटे आरोप करत आहे. आमचे लष्कर हे जगातील सर्वात जास्त नीतिमत्ता असलेले सैन्य आहे."
"किर्यात गातमध्ये असलेल्या समन्वय केंद्रातून स्पेनच्या प्रतिनिधींना याच कारणामुळे बाहेर जाण्यास सांगितले होते. कारण स्पेन वारंवार इस्रायलच्या विरोधातच उभा राहिला आहे. जे लोक दहशतवादी सरकारच्या विरोधात उभे राहण्याऐवजी इस्रायलवर हल्ले करतात, ते भविष्यात आमचे भागीदार होऊ शकत नाही. जे देश आमच्या नागरिकांवर हल्ले करतील इस्रायल त्यांच्या विरोधात गप्प बसणार नाही", असा इशाराही नेतन्याहूंनी दिला.