रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:16 IST2025-02-18T19:15:51+5:302025-02-18T19:16:25+5:30
US-Russian Meeting in Saudi Arabia: रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात आज सौदी अरेबियामध्ये रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली.

रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..?
Ukraine President on US-Russian Diplomats Meeting : रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन वर्षाहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. पण, आता हे युद्ध संपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी (18 फेब्रुवारी) सौदी अरेबियातील रियाध येथे रशिया आणि अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. विशेष म्हणजे, गरज भासल्यास रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे प्रमुख वोलोडिमिर झेलेन्स्कींना भेटण्यास तयार आहेत.
युक्रेनसंदर्भातील चर्चेतून युक्रेन गायब
सौदी अरेबियातील रियाधमध्ये रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात रशियन आणि अमेरिकन मुत्सद्दींमध्ये चर्चा झाली, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चर्चेत युक्रेनच्या एकाही अधिकाऱ्याचा समावेश नव्हता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या बैठकीवर जाहीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, युक्रेनच्या सहभागाशिवाय युक्रेनसाठी केलेला कोणताही करार किंवा चर्चा आम्हाला मान्य नाही.
दरम्यान, झेलेन्स्की सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. मात्र त्यांचा दौरा रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या एक दिवसानंतर होणार आहे. पण, या दौऱ्यात ते कोणत्याही रशियन किंवा अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटणार नसल्याचे युक्रेनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
पुतिन अन् झेलेन्स्कींशी ट्रम्पची चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात शांतता चर्चेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि झेलेन्स्की या दोघांशीही फोनवर चर्चा केली आहे. मात्र, युक्रेनकडे दुर्लक्ष करून ट्रम्प यांनी प्रथम पुतिन यांच्याशी चर्चा करून युद्ध संपवण्याची चर्चा केल्याने दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. ट्रम्प, झेलेन्स्कीवर सुरक्षेच्या बदल्यात युक्रेनमधील 50 टक्के खनिजे अमेरिकेला देण्यासाठी दबाव आणत आहेत, ज्याला झेलेन्स्की यांनी सहमती दर्शवली आहे.
बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन हल्ले
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकन आणि रशियन अधिकारी सौदी अरेबियात बैठक घेत आहेत. मात्र यादरम्यानही दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने कीववर ड्रोनने हल्ला केला आहे. युक्रेनच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने युक्रेनवर रात्रभर 176 ड्रोन हल्ले केले, त्यापैकी बहुतांश नष्ट झाले.