Donald Trump Warns China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त कर अमेरिकेकडून २७ ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. काही तासांनी हा अतिरिक्त कर लागू होईल. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतावर कर लागू करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, ट्रम्प यांनी चीनला धमकी देण्यास सुरुवात केली आहे. चीनविरुद्ध कठोर भूमिका घेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी चीनला इशारा दिला. अमेरिकेकडे काही पत्ते आहेत, जर मी हे पत्ते खेळले तर चीन उद्ध्वस्त होईल. गरज पडल्यास अमेरिका कठोर कारवाई करू शकते, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल एक मोठे विधान केले आहे. चीन आणि अमेरिकेतील संबंध आता सुधारत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र भारत आणि चीनमधील वाढती जवळीक देखील ट्रम्प यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. बदलती जागतिक समीकरणे अमेरिकेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे ट्रम्प यांनी थेट चीनला धमकी दिली. आपल्या निर्णयांमुळे चीनवर गंभीर परिणाम होऊ शकतो पण चांगल्या संबंधांसाठी त्यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं.
"अमेरिका चीनशी चांगले संबंध निर्माण करणार आहे. चीनशी आमचे संबंध उत्तम असतील. त्यांच्याकडे (चीन) काही पत्ते आहेत. आमचेही अविश्वसनीय असे पत्ते आहेत. पण मला ते पत्ते खेळायचे नाहीत. जर मी ते पत्ते खेळलो तर ते चीनला उद्ध्वस्त करतील. मी हे पत्ते खेळणार नाही," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प हे बोलत असताना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग त्यांच्या शेजारी बसले होते.
दुसरीकडे, ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल काहीही सांगितले नसले तरी, त्यांनी संकेत दिले की जर चीनने अमेरिकेला ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण उद्योगांसाठी आवश्यक असलेले मॅग्नेट पुरवले नाहीत तर ते २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादू शकतात. 'त्यांना आम्हाला मॅग्नेट द्यावे लागतील, जर त्यांनी हे केले नाही तर त्यांना २०० टक्के शुल्क किंवा दुसरे काहीतरी लादावे लागेल,' असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.