ट्रम्प यांच्या एका सहीमुळे जगभरातील दिग्गजांची झोप उडाली; एपस्टीन फाइल्स होणार सार्वजनिक, सेक्स ट्रॅफिकिंगच्या तपासाचे सत्य उघड होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:08 IST2025-11-20T13:42:52+5:302025-11-20T14:08:05+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्टवर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे जेफ्री एपस्टाईनच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित फाइल्स प्रसिद्ध होतील.

ट्रम्प यांच्या एका सहीमुळे जगभरातील दिग्गजांची झोप उडाली; एपस्टीन फाइल्स होणार सार्वजनिक, सेक्स ट्रॅफिकिंगच्या तपासाचे सत्य उघड होणार
Epstein Files: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित 'एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट' वर सही केली आहे. या महत्त्वपूर्ण कायद्यामुळे, अमेरिकेच्या न्याय विभागाला गुन्हेगार जेफरी एपस्टीन याच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाशी संबंधित सर्व दस्तऐवज ३० दिवसांच्या आत सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे एपस्टीनच्या हाय-प्रोफाइल नेटवर्कमधील अनेक राष्ट्राध्यक्ष, राजकारणी, अब्जाधीश आणि सेलिब्रिटींचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जागतिक राजकारण आणि उच्चभ्रू वर्तुळात मोठी खळबळ उडणार आहे.
काय आहे 'एपस्टीन फाइल्स'?
जेफरी एपस्टीन हा एक अमेरिकन आर्थिक सल्लागार आणि गुंतवणूकदार होता. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंग, अल्पवयीन मुलींचे शोषण आणि संघटित गुन्हेगारीचे गंभीर आरोप होते. २०१६ मध्ये अटकेनंतर २०१९ मध्ये, सेक्स ट्रॅफिकिंगच्या खटल्याची सुनावणी सुरू असतानाच, त्याचा जेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू अधिकृतपणे आत्महत्या असल्याचे घोषित केले होते.
एपस्टीन फाइल्स या २०१५ मध्ये एका पीडितेने एपस्टीनची सहयोगी घिस्लेन मॅक्सवेल हिच्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याशी संबंधित न्यायालयाचे दस्तऐवज आहेत. यामध्ये फ्लाइट लॉग्स, ईमेल्स आणि गवाहींचा समावेश आहे. जानेवारी २०२४ मध्ये काही फाइल्स उघड झाल्यानंतर, आता ट्रम्प यांच्या आदेशाने २०१९ मध्ये एपस्टीनच्या जेलमधील मृत्यूच्या तपासासह सर्व फाईल्स सार्वजनिक होणार आहेत.
फाइल्समध्ये जगभरातील मोठी नावे
या फाइल्समध्ये आतापर्यंत अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींची नावे समोर आली आहेत. ही नावे एपस्टीनच्या सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्कशी संबंधित आहेत, पण यापैकी प्रत्येकावर थेट गैरकृत्याचा आरोप नाही. किंग चार्ल्स यांचे बंधू ड्यूक ऑफ माउंटबॅटन विंडसर अँड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्हाईट हाऊस सल्लागार कॅथरीन रुमलर, आणि माजी ट्रेझरी सेक्रेटरी लॅरी समर्स यांचा समावेश आहे.
दिवंगत पॉप आयकॉन मायकल जॅक्सन, अब्जाधीश गुंतवणूकदार पीटर थिएल, भाषिक आणि सामाजिक कार्यकर्ते नोम चोम्स्की, आणि ज्येष्ठ पत्रकार मायकल वुल्फ यांची नावेही समोर आली आहेत.
३० दिवसांची मुदत
ट्रम्प यांच्या स्वाक्षरीमुळे न्याय विभागाने ३० दिवसांच्या आत फाईल्स सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. मात्र काही संवेदनशील माहिती जाहीर होण्यापासून रोखली जाऊ शकते. ॲटर्नी जनरल पाम बॉन्डी यांना अशा फाईल्स रोखण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या फेडरल तपासाला धोका निर्माण होऊ शकतो. पीडितांची ओळख उघड होईल असे कोणतेही व्हिडिओ किंवा दस्तऐवज सार्वजनिक केले जाणार नाहीत, जेणेकरून त्यांचे हित जपले जाईल.