खामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक, आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:50 IST2026-03-01T14:12:24+5:302026-03-01T14:50:25+5:30
US Military Firing On Pakistani Protesters: इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली.

खामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक, आंदोलकांचा दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू
शनिवारपासून अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या कारवाईदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई हे मारले गेले आहेत. दरम्यान, इराणवर करण्यात आलेला हल्ला आणि खामनेई यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली असून, आक्रमक आंदोलकांनी आज अमेरिकेच्या कराची येथील दूतावासावर हल्ला केला. आंदोलकांनी दूतावासामध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. दरम्यान, आंदोलकांना हुसकावून लावून परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ८ आंदोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांचा अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर पाकिस्तानमध्ये संतापाचा उद्रेक झाला. तसेच लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, कराचीमधील एम.टी.खान रोड येथे असेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासमोर आंदोलक गोळा झाले. तसेच आंदोलकांनी खामनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आल्याविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान, परिस्थिती चिघळली आणि आंदोलकांनी अमेरिकन दूतावासाच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. काही आंदोलक दूतावासात घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. दरम्यान, जमावाला नियंत्रित करण्यासाठी तिथे असलेले पोलीस आणि अमेरिकन सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे गोळे सोडले. त्यानंतर थेट गोळीबार गेला.
या गोळीबारात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. तसेत जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर दूतावासाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.