भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:58 IST2025-11-11T12:57:43+5:302025-11-11T12:58:38+5:30
US May Cut India Tariff: 'भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यामुळे अमेरिका शुल्क कमी करणार आहे.'

भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
US May Cut India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ (आयात शुल्क) कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यामुळे आता अमेरिका भारतावरील शुल्क कमी करणार आहे. यासोबतच, ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार करार (India-US Trade Deal) लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल, असेही स्पष्ट केले आहे.
रशियन तेलामुळे वाढवला होता टॅरिफ
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, सध्या भारतावर रशियन तेलाच्या खरेदीमुळे खूप जास्त टॅरिफ लागू आहे. पण आता भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे आम्ही भारतावर लावलेले उच्च टॅरिफ कमी करणार आहोत.
यापूर्वीही ट्रम्प यांनी भारताबरोबरच्या व्यापार संबंधांबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती आणि भारताशी ट्रेड डील अत्यंत जवळ असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, लवकरच भारतीय मालावर लावलेले उच्च आयात शुल्क कमी केले जाईल.
Trump will reduce tariff on India, because India has reduced buying Russia oil substantially.
— Cat Dylan (@CatDylanNews) November 11, 2025
pic.twitter.com/TxjX1UkumD
दुप्पट केले होते शुल्क
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्क्यांचे परस्पर आयात शुल्क लावले, परंतु पुढे ते वाढवून 50 टक्के करण्यात आले. त्यावेळी ट्रम्प यांनी आरोप केला होता की, भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी करुन युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत आहे. अमेरिकेच्या मंत्र्यांनीही या मुद्द्यावर भारतावर टीका केली होती.
व्यापार करारावर पुन्हा गती
भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराविषयी (India-US Trade Deal) बोलायचे झाल्यास, दोन्ही देशांदरम्यान या वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये औपचारिक चर्चा पुन्हा सुरू झाली होती. दोन्ही देशांच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर (Bilateral Trade Agreement - BTA) चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतावर टॅरिफ दुप्पट केले, तेव्हा या चर्चेवर विराम लागला. त्यापूर्वी पाच फेऱ्यांपर्यंत चर्चा पूर्ण झाली होती. आता पुन्हा दोन्ही देशांमधील व्यापारी संवाद नव्या दिशेने पुढे जात आहे.