US Market Crash: अमेरिकेन शेअर बाजार कोसळला; एका दिवसात जेफ बेझोस यांचे 80,000 कोटी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 21:49 IST2022-09-14T21:48:39+5:302022-09-14T21:49:08+5:30
US Market Down: जेफ बेजोस यांच्यासह एलोन मस्क, मार्क झुकेरबर्ग आणि बिल गेट्ससह अनेकांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.

US Market Crash: अमेरिकेन शेअर बाजार कोसळला; एका दिवसात जेफ बेझोस यांचे 80,000 कोटी बुडाले
Jeff Bezos Net Worth: मंगळवारी अमेरिकेत महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा झटका जगातील टॉपच्या अब्जाधीशांनाही बसलाय. जगातील अनेक श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
जेफ बेझोस यांना मोठा झटका
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या संपत्तीत एका दिवसात $9.8 बिलियन (सुमारे 80,000 कोटी रुपये) घट झाली आहे. जेफ बेझोस यांच्या मालमत्तेत सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. यानंतर एलोन मस्कच्या संपत्तीत 8.4 अब्ज डॉलर (70 हजार कोटी रुपये) घट झाली आहे.
आणि कोणाचे किती नुकसान झाले?
ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या संपत्तीत $4 अब्जांपेक्षा जास्त घट झाली आहे, तर वॉरेन बफेट आणि बिल गेट्स यांना अनुक्रमे $3.4 अब्ज आणि $2.8 अब्ज नुकसान झाले आहे.
यूएस बाजार 1300 अंकांनी कोसळला
यूएस बाजारातील घसरणीनंतर, डाऊ जोन्स सुमारे 1300 अंकांनी घसरला आणि S&P देखील 500 अंकांनी घसरला. अमेरिकेत किरकोळ चलनवाढीचा दर ऑगस्ट महिन्यात 8.3 टक्के होता. याशिवाय अमेरिकेच्या बाजारपेठेत खाद्यपदार्थ आणि उर्जेच्या किमतीत मोठा चढउतार पाहायला मिळत आहे.
अपेक्षेपेक्षा वाईट आकडेवारी
अमेरिकेतील आकडेवारी अपेक्षेपेक्षा खूपच वाईट आली आहे. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करू शकते. याच कारणामुळे चलनवाढीचे आकडे येताच अमेरिकन शेअर बाजारात चौफेर विक्री झाली.