व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचा मोर्चा आता क्यूबाकडे? परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची उघड धमकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:26 IST2026-01-04T09:26:42+5:302026-01-04T09:26:51+5:30
US Marco Rubio Cuba Warning : अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी क्यूबाच्या सरकारला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. व्हेनेझुएलातील मादुरोच्या अटकेनंतर आता क्यूबा अमेरिकेच्या रडारवर आहे का? वाचा सविस्तर.

व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचा मोर्चा आता क्यूबाकडे? परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची उघड धमकी...
वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने अटक केल्यानंतर आता दक्षिण अमेरिकेतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी क्यूबाच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून, "जर मी हवानामध्ये (क्यूबाची राजधानी) सरकारमध्ये असतो, तर आता मला नक्कीच चिंता वाटली असती," असे खळबळजनक विधान केले आहे.
मार्को रुबिओ यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, क्यूबा सध्या पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत आहे. ते म्हणाले, "क्यूबा हा एक आपत्तीजनक देश आहे, जो अकार्यक्षम आणि वृद्ध व्यक्तींकडून चालवला जात आहे. तिथे अर्थव्यवस्था शिल्लक नाही." मादुरो यांना संरक्षण देणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमध्ये आणि त्यांच्या गुप्तचर संस्थेत मोठ्या प्रमाणावर क्यूबन नागरिक भरलेले होते, असा दावाही रुबिओ यांनी केला आहे.
'व्हेनेझुएलाला क्यूबापासून स्वातंत्र्य हवे'
रुबिओ यांच्या मते, व्हेनेझुएलाची सर्वात मोठी समस्या ही होती की तो देश एक प्रकारे क्यूबाची वसाहत बनला होता. आता मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाला खऱ्या अर्थाने क्यूबाच्या प्रभावापासून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज आहे. क्यूबाने व्हेनेझुएलाच्या सुरक्षेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता, जो आता अमेरिकेने मोडीत काढला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही क्यूबाला 'अयशस्वी राष्ट्र' म्हटले आहे. क्यूबातील कम्युनिस्ट प्रणालीमुळे तिथल्या जनतेने अनेक दशके दुःख सोसले असून, आता तिथल्या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आली असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिका केवळ क्यूबातील जनतेलाच नाही, तर तिथून परागंदा होऊन अमेरिकेत राहणाऱ्या लोकांनाही मदत करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.