युद्ध अटळ! इराणने पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेने ठेवल्या होत्या १५ अटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:09 IST2026-03-25T16:57:51+5:302026-03-25T17:09:04+5:30
तेल बाजारातील या उलथापालथीमुळे ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अनिश्चितता असून गुंतवणूकदारांची चिंता स्पष्टपणे जाणवत आहे.

युद्ध अटळ! इराणने पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेने ठेवल्या होत्या १५ अटी
इस्लामाबाद - मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक आणि लष्करी हालचाली तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेचा १५-कलमी शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवण्यात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र तेहरानने वॉशिंग्टनसोबत वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला आहे असं वृत्त रॉयटर्सनं दिले आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव इस्लामाबादमधील मध्यस्थांमार्फत इराणला सादर करण्यात आला आहे. त्यात निर्बंध शिथिलता, नागरी अणुसहकार्य, इराणच्या अणुकार्यक्रमात कपात, त्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची परवानगी यासह अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. पाकिस्तानकडून हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी तैनातीआधीच वाढवली आहे. वॉशिंग्टनने मरीन सैनिकांच्या मदतीसाठी मध्य-पूर्वेत पॅराट्रूपर्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. राजनैतिक वाटाघाटींसोबतच लष्करी तयारीही सुरू आहे हे यावरून स्पष्ट होते.
दुसरीकडे इराणने या राजनैतिक प्रयत्नांना गांभीर्याने घेण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवली आहे. तेहरानने बुधवारी इस्रायल आणि आखाती प्रदेशावरील आपले हल्ले तीव्र केले. त्यांनी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले, जिथे मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. इराणच्या आक्रमक धोरणाचा परिणाम केवळ लष्करी बाबींपुरता मर्यादित नाही. प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कडक निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सुमारे एक-पंचमांश तेलाचा प्रमुख मार्ग आहे. ज्यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
तेल बाजारातील या उलथापालथीमुळे ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अनिश्चितता असून गुंतवणूकदारांची चिंता स्पष्टपणे जाणवत आहे. एकंदरीत राजनैतिक प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती गंभीर होऊ शकते. इराण सातत्याने मोठे हल्ले करत असून इस्रायल सर्वात असुरक्षित बनला आहे. इराण आणि इस्रायलमधील अंतर १,५०० किलोमीटर असून ते इराणच्या प्राणघातक क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येते. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण घोषित करून संकट वाढवले आहे. आता त्याने आखाती देशातील अमेरिकी तळांवरील हल्ले तीव्र केले आहेत. अलीकडेच, ट्रम्प यांनी मध्य पूर्वेकडील देशांची प्रशंसा केली. ही प्रशंसा इराणप्रती शत्रुत्वाचे एक प्रमुख कारण बनली आहे. इराणने कतार आणि ओमानसारख्या एकेकाळच्या जवळच्या मित्र राष्ट्रांच्या भूमीवरही बॉम्बहल्ला केला आहे. इराणने कतारच्या अल उदेद हवाई तळावर हल्ला केला आणि बहरीनवरही बॉम्बहल्ला केला.
दरम्यान, इराणकडून अमेरिकेच्या नौदलाच्या ५ व्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या हवाई दलाद्वारे वापरल्या जाणाऱ्या ओमानमधील थामारत हवाई तळावरही हल्ला झाला. सौदी अरेबियातील हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. कुवेतच्या अली अल सालेम हवाई तळावर बॉम्ब टाकण्यात आले. इराकच्या एरबिलपर्यंत क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तेथील अनेक उंच इमारती एका शक्तिशाली स्फोटामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. इस्रायली आणि अमेरिकन हल्लेही तीव्र होत आहेत. इराणी माध्यमांनुसार बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ नवीन हल्ले झाले आहेत. इराणच्या अनेक अणुसुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. नतान्झ, फोर्डो आणि बुशेहर येथे बॉम्ब पडले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ले सुरू झाल्यापासून बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावरील हा दुसरा हल्ला आहे.