डोनाल्ड ट्रम्प यांना होर्मुझ मोहिमेतून माघार घ्यायला लावणारी 'ती' व्यक्ती अखेर कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:26 IST2026-04-01T15:22:54+5:302026-04-01T15:26:33+5:30
१६ मार्च रोजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी ओवल ऑफिसमध्ये संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि सुरक्षा सल्लागार जनरल केन यांच्यासोबत बैठक घेतली

डोनाल्ड ट्रम्प यांना होर्मुझ मोहिमेतून माघार घ्यायला लावणारी 'ती' व्यक्ती अखेर कोण आहे?
वॉशिंग्टन - अमेरिका-इस्रायलनं इराणविरोधात युद्धाला सुरुवात करून आज ३३ दिवस झालेत. त्यात स्ट्रेट होर्मुझ मोहिमेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली आहे. होर्मुझबाबत अमेरिकेला देणेघेणे नाही. ज्या देशांना तेल हवंय, त्या देशांनी स्वत: बघावे. आम्ही इराण युद्धातून बाहेर पडण्याची तयारी करत आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने ५० हजाराहून अधिक सैनिक मध्य पूर्वेत तैनात केले आहेत. होर्मुझवर नियंत्रण मिळवण्यासाठी कमीत कमी ३ राऊंड बैठका झाल्या आहेत. मग अचानक ट्रम्प यांनी होर्मुझवरून प्लॅन का बदलला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
केन यांनी बैठकीत समजावला डाव
१६ मार्च रोजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी ओवल ऑफिसमध्ये संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि सुरक्षा सल्लागार जनरल केन यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी केन यांना अखेर आपण सैन्य होर्मुझमध्ये का पाठवत नाही, इराणने होर्मुझ मार्ग कसा ब्लॉक केला असे प्रश्न विचारले. त्यावर केन यांनी ट्रम्प यांना संपूर्ण आढावा दिला. याठिकाणी ताकदीने कब्जा केला जाऊ शकत नाही. इराणने अत्यंत हुशारीने आपले सैन्य तिथे तैनात केलंय. एका किरकोळ नौकाही अमेरिकन युद्धनौकेला बर्बाद करू शकते असं त्यांनी सांगितले.
होर्मुझमध्ये कारवाई का नाही?, केन यांनी दिली उत्तरे
होर्मुझची सामुद्रधुनी खूप अरुंद आहे. तिथे युद्धनौका पाठवणे धोक्याचे आहे. एक साधा ड्रोन अब्जावधी डॉलर्सच्या युद्धनौका नष्ट करू शकतो
होर्मुझमध्ये सैन्य पाठवल्याने युद्ध लांबणीवर पडू शकते. त्यामुळे केवळ नुकसानच होईल, फायदा नाही
इराण सरकार होर्मुझच्या नियंत्रणासाठी शरणागती पत्करेल याची कोणतीही खात्री नाही. आपण तिथे किती काळ लढणार?
जरी होर्मुझचा मार्ग अडवला गेला तरी अमेरिकेचे नुकसान नगण्य असेल, कारण त्यामधून आपण फारसा व्यापार करत नाही.
होर्मुझ जगासाठी इतकं महत्त्वाचं का?
पर्शियन आखातातील कोणत्याही जहाजाला ओमानच्या आखातात प्रवेश करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जावेच लागते. हा ओमान आणि इराणमधील एक अरुंद मार्ग आहे.
१. सामान्य दिवसांमध्ये दररोज अंदाजे २०-२१ दशलक्ष बॅरल तेल होर्मुझमधून जाते. हे जगाच्या एकूण तेल वापराच्या २० टक्के आहे.
२. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक एलएनजी निर्यातीपैकी अंदाजे २० टक्के निर्यात होते, ज्यापैकी बहुतेक माल कतारमधून पाठवला जातो.
३. अरब देश होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगभरात आपला माल पाठवतात. व्यापाराच्या दृष्टिकोनातून अरब जगासाठी खूप महत्त्वाचे आहे.
जनरल डेन केन कोण आहेत?
दरम्यान, ५७ वर्षीय जनरल केन हे अमेरिकेचे लष्करी सल्लागार आहेत. ते राष्ट्रपती ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे प्रमुख आहेत आणि अमेरिकेतील एक फोर-स्टार जनरल देखील आहेत. केन हे इराण युद्धाचे विरोधक मानले जातात. केन यांनी सुरुवातीला इराण युद्धाला विरोध केला होता परंतु स्टीव्ह विटकॉफ आणि पीट हेगसेथ यांच्या प्रभावामुळे ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढवला.