अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे तेहरान हादरले! हुथी बंडखोरही संघर्षात उतरले; तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 08:32 IST2026-03-29T08:17:27+5:302026-03-29T08:32:44+5:30
तेहरान समर्थक हौथी बंडखोरांनी शनिवारी दक्षिण इस्रायलवर दोन क्षेपणास्त्र हल्ले करून या संघर्षात औपचारिकपणे प्रवेश जाहीर केला. हौथींच्या या आक्रमणामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तसेच बाब अल-मंदेबमधून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे तेहरान हादरले! हुथी बंडखोरही संघर्षात उतरले; तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागली
मागील एक महिन्यापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरू आहे. आता हा तणाव आणखी वाढला असून आता तेहरान-समर्थक हौथी बंडखोरांनी शनिवारी दक्षिण इस्रायलवर दोन क्षेपणास्त्र हल्ले करून या संघर्षात औपचारिकपणे प्रवेश केला. यामुळे आता या युद्धाची तीव्रता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
हुथी बंडखोरांच्या सक्रियतेनंतर, होर्मुझ सामुद्रधुनी तसेच बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे सैन्य दाखल; इराणचा इशारा, यूएस त्रिपोली युद्धनौका मध्यवर्ती कमांडच्या कार्यक्षेत्रात दाखल
दरम्यान, इराणने एक खळबळजनक दावा केला आहे की, त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्डने दुबईतील अमेरिकी सैनिकांच्या दोन गुप्त तळांवर अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करून अंदाजे ५०० सैनिक ठार केले.
त्याचबरोबर, फार्स प्रांतात एक अमेरिकन एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा आणि पर्शियन आखातातील सहा अमेरिकी सामरिक जहाजांना लक्ष्य केल्याचाही दावा केला आहे. दरम्यान, इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या बुशेहर अणुसुविधेवर हल्ला केला.
अणुऊर्जा प्रकल्पावरील हा तिसरा हल्ला
दहा दिवसांत या अणुऊर्जा प्रकल्पावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. किरणोत्सर्गाचा कोणताही धोका असल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी इराणच्या इतर दोन अणुऊर्जा प्रकल्पांवरही हल्ला झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची अंतिम मुदत वाढवली असतानाच ही घटना घडली आहे.
एएनआयने इराणच्या सरकारी फार्स न्यूज एजन्सीच्या हवाल्याने म्हटले आहे की, हजरत खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दुबईमधील अमेरिकी लष्कराच्या दोन गुप्त तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला.
इराणने अमेरिकी सैनिकांना लक्ष्य केले
पहिल्या तळावर अंदाजे ४०० आणि दुसऱ्या तळावर अंदाजे १०० अमेरिकी सैनिक उपस्थित होते. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकी तळांना लक्ष्य केल्यानंतर या सैनिकांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले, असा दावा इराणने केला आहे.
हल्ल्याच्या एक दिवस आधी, आयआरजीसीने हे तळ ओळखल्याचा इशारा दिला होता आणि लोकांना तेथून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. अमेरिकी सेंट्रल कमांडने सर्व सैनिक सुरक्षित असल्याचे सांगून हे दावे फेटाळून लावले. एका निवेदनात, सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, इराणी राजवट इंटरनेटवर खोट्या बातम्या पसरवून आपली कमकुवत झालेली लष्करी क्षमता लपवण्याचा प्रयत्न करत आहे.