४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:05 IST2026-04-05T16:04:29+5:302026-04-05T16:05:08+5:30
ट्रम्प प्रशासनाने इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी किंवा शांतता करार करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराण यांच्या वाढत्या तणावात आता आणखी वळण येणार आहे. अमेरिकेने त्यांची लांब पल्ल्याची मिसाइल इराणविरोधात वापरण्यासाठी त्यांच्या सैन्य तळांवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. इराण युद्धासाठी तैनात करण्यात आलेली ही लांब पल्ल्याची शस्त्रप्रणाली अत्यंत अचूक मारा करणाऱ्या शस्त्रांपैकी एक आहे. लॉकहीड मार्टिनने तयार केलेल्या JASSM-ER क्रूझ मिसाइलची रेंज ९३० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ही मिसाइल शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या बाहेर राहून टार्गेटवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
JASSM-ER मिसाइलचं वैशिष्टे काय?
१. JASSM-ER क्रूझ मिसाइल १,००० पौंड वजनाच्या पेनेट्रेटिंग स्फोटक-फ्रॅगमेंटेशन वॉरहेडने सुसज्ज आहे, जी मजबूत ठिकाणे भेदण्यास सक्षम आहे.
२. ही मिसाइल अमेरिकी हवाई दलाच्या F15-E, F 16 सारख्या लढाऊ विमानांमधून आणि B1, B2 आणि B52H सारख्या बॉम्बर विमानांमधून प्रक्षेपित केली जाऊ शकते.
३. JASSM-ER मिसाइलची स्टेल्थ क्षमता त्याला शत्रूच्या रडारपासून बचाव करते. ज्यामुळे पायलटला सुरक्षित अंतरावरून हल्ले करता येतात.
४. प्रत्येक मिसाइलची किंमत अंदाजे १.५ मिलियन डॉलर्स (१२.७ कोटी रुपये) आहे.
५. इराण संघर्षाच्या पहिल्या चार आठवड्यांत अमेरिकेने एक हजाराहून अधिक JASSM-ER मिसाइलचा वापर केला आहे.
अमेरिकेने आपल्या एकूण JASSM-ER शस्त्रसाठ्यापैकी सुमारे ८२ टक्के क्षेपणास्त्रे इराण युद्धासाठी आधीच तैनात केली आहेत. युद्धापूर्वी असलेल्या सुमारे २,३०० क्षेपणास्त्रांपैकी आता इतरत्र तैनात करण्यासाठी केवळ ४२५ क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. ही क्षेपणास्त्रे पॅसिफिक आणि अमेरिकेच्या भूमीवरून सेंट्रल कमांडच्या तळांवर आणि यूकेमधील फेअरफोर्ड येथे नेली जात आहेत. ट्रम्प प्रशासनाने इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी किंवा शांतता करार करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर B-52H बॉम्बर्सची तैनातीदेखील होताना दिसत आहे.
दरम्यान, JASSM सीरीजमधील या विस्तारित रेंजमधील प्रकार लॉकहीड मार्टिनने २००१ पासून तयार केला असून तो दोन दशकांपासून अमेरिकन सैन्याच्या ताफ्यात आहे. याचा वापर केवळ इराणविरुद्धच नव्हे तर व्हेनेझुएलासारख्या इतर मोहिमांमध्येही करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रांच्या तैनातीचा चीनसारख्या इतर देशांविरुद्धच्या अमेरिकेच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो परंतु इराणसारख्या मजबूत हवाई संरक्षण असलेल्या देशाविरुद्ध ते अत्यंत प्रभावी ठरत आहे.