सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:32 IST2026-04-06T13:31:56+5:302026-04-06T13:32:35+5:30
US-Iran War Impact: इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. वाहनधारकांना अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागत असून जागतिक तेल संकट गडद झाले आहे.

सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या खिशावरही मोठे 'बॉम्ब' पडत आहेत. ताज्या अहवालानुसार, इराण युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेतील वाहनधारकांना इंधनासाठी अतिरिक्त अब्जावधी डॉलर्स मोजावे लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अमेरिकेतील गॅसोलीनचे (पेट्रोल) दर गगनाला भिडले आहेत.
अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकन ड्रायव्हर्सनी इंधनावर दररोज सरासरी ३० ते ४० टक्के अधिक खर्च केला आहे. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेल्यामुळे आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अमेरिकेतील 'रिटेल' इंधन दरांवर झाला आहे.
ट्रम्प सरकारवर दबाव वाढला
निवडणुकीत इंधन दर कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. युद्धामुळे अमेरिकेतील महागाईचा दर वाढला असून, लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यामुळे भविष्यात इंधन दर आणखी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतावर काय होणार परिणाम?
अमेरिकेप्रमाणेच भारत देखील आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेसाठी ८०% हून अधिक आयातीवर अवलंबून आहे. जर अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेला इतका मोठा फटका बसत असेल, तर भारतीय बाजारपेठेतही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. इराणने भारताला विशेष सवलत दिली असली तरी, जागतिक स्तरावर वाढलेले विम्याचे दर आणि मालवाहतूक खर्च सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू शकतो.