तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका आता एका भीषण वळणावर पोहोचला आहे. जर अमेरिकेने जमिनीवरून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे सैन्य आगीत जळून खाक होतील, असा थेट अन् कठोर इशारा इराणने दिला आहे. एकीकडे युद्ध थांबविण्यासाठी पाकिस्तानमध्ये राजनैतिक बैठकांचे सत्र सुरू असले तरी इस्रायल-अमेरिका हल्ले आणि इराणकडून प्रत्युत्तर सुरूच असल्याने संघर्ष अधिकच चिघळला आहे.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका एकीकडे शांततेची चर्चा करत असताना दुसरीकडे मध्यपूर्वेत अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे. हा केवळ एक दिखावा आहे. इराण आपल्या मातीवर कोणत्याही परकीय सैन्याला पाऊल ठेवू देणार नाही. त्यांना कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल. याचदरम्यान, इराणने इस्रायली आणि अमेरिकी लक्ष्यांवर आपला ८६ वा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला केला आहे. लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या तीन पत्रकारांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.
हौथींचा प्रवेश; युद्ध विस्ताराने चिंता
हौथी बंडखोरही आता या युद्धात उतरले असून त्यांनी इस्रायलमधील लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. यामुळे लाल समुद्र आणि जागतिक समुद्री व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणमध्ये २५० विद्यार्थी-शिक्षकांचा मृत्यू: ६०० शैक्षणिक संस्थांवर परिणाम
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत किमान २५० विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला असून सुमारे ६०० शैक्षणिक संस्थांवर हल्ले झाल्याची माहिती इराणच्या शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या हल्ल्यांत १८४ विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तेहरानमध्येच १६ विद्यार्थी आणि ५ शिक्षकांचा मृत्यू झाला असून ८ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाले आहेत. या संघर्षात सुमारे २०० प्रशासकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक इमारतींचे नुकसान झाले आहे. आता आम्ही इस्रायली आणि अमेरिकन विद्यापीठांना टार्गेट करू, असा इशारा इराणने दिला आहे.
दोन एलपीजी टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे; ४८५ भारतीय अजूनही अडकलेलेच
२४,००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन जाणारे दोन टैंकर होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारताच्या दिशेने येत आहेत. सरकारच्या माहितीनुसार, दोन्ही टैंकर या आठवड्यात मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतीय ध्वज असलेले चार एलपीजी टैंकर हा मार्ग पार करून गेले आहेत, तर इतर तीन अजूनही सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात आहेत. १८ भारतीय जहाजे आणि ४८५ भारतीय खलाशी अजूनही या परिसरात उपस्थित आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार इराण सरकारशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Web Summary : Iran warns US against ground invasion. Attacks escalate, impacting education; 250 students/teachers dead, 600 institutions affected. Houthis join, threatening trade routes. Indians stranded; efforts underway.
Web Summary : ईरान ने अमेरिका को जमीनी आक्रमण के खिलाफ चेतावनी दी। हमले बढ़े, शिक्षा प्रभावित; 250 छात्र/शिक्षक मृत, 600 संस्थान प्रभावित। हौथी शामिल, व्यापार मार्गों को खतरा। भारतीय फंसे; प्रयास जारी।