'खार्ग' बेटावर ताबा मिळवणार? अमेरिकेचे एफ-३५ फायटर जेट्स सज्ज; ट्रम्प यांच्या एका निर्णयाकडे जगाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:28 IST2026-03-29T16:26:47+5:302026-03-29T16:28:39+5:30
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची मोठी कारवाई! ३,५०० मरीन सैनिकांसह USS ट्रिपोली मध्यपूर्वेत दाखल

'खार्ग' बेटावर ताबा मिळवणार? अमेरिकेचे एफ-३५ फायटर जेट्स सज्ज; ट्रम्प यांच्या एका निर्णयाकडे जगाचे लक्ष
इराण आणि इस्रायलमधील युद्धाला एक महिना पूर्ण होत असतानाच, अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली लष्करी ताकद कित्येक पटीने वाढवली आहे. अमेरिकेचे महाकाय युद्धनौका युएसएस ट्रिपोली ३,५०० हून अधिक घातक मरीन सैनिकांसह या क्षेत्रात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांतील हा अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी ताफा असून, आता अमेरिका इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशन म्हणजेच जमिनीवरून हल्ला करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
२० वर्षांतील सर्वात मोठी लष्करी नाकेबंदी
अमेरिकन सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, या नवीन तैनातीनंतर मध्यपूर्वेत आता एकूण ५०,००० अमेरिकन सैनिक तैनात झाले आहेत. युएसएस ट्रिपोलीवर केवळ सैनिकच नाहीत, तर अत्याधुनिक F-35 फायटर जेट्स, सीहॉक हेलिकॉप्टर्स आणि ओस्प्रे ट्रान्सपोर्ट विमाने सज्ज आहेत. ही युद्धनौका आधी जपानमध्ये तैनात होती आणि तैवानजवळ सराव करत होती, मात्र इराणसोबतचा संघर्ष पाहता तिला तातडीने इकडे वळवण्यात आले आहे.
इराणच्या तेल केंद्रांवर नजर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्य इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या 'खार्ग बेटा'च्या जवळ तैनात केले जाऊ शकते. हे बेट इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे. जर या भागावर नियंत्रण मिळवले, तर इराणची आर्थिक नाडी अमेरिकेच्या हातात येईल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, हे ऑपरेशन महिनोंमहिने चालणार नाही, तर काही आठवड्यांतच संपवले जाऊ शकते. जमिनीवर सैन्य न उतरवताही लक्ष्य गाठता येईल, असा त्यांचा दावा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा सस्पेन्स कायम
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप जमिनीवरील हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ते या भागात अतिरिक्त १०,००० सैनिक पाठवण्याचा विचार करत असल्याचे समजते. दुसरीकडे, अमेरिकेची सर्वात नवीन युद्धनौका 'युएसएस जेराल्ड आर फोर्ड' दुरुस्तीसाठी युरोपकडे रवाना झाली असली तरी, ट्रिपोलीच्या आगमनाने इराणवरील दबाव कैक पटीने वाढला आहे.
इराणने आधीच परिणाम भोगण्याची धमकी दिली असताना, अमेरिकेच्या या हालचालींमुळे हे युद्ध आता केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रणांगणावरील संघर्षात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.