अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:26 IST2026-01-13T09:25:52+5:302026-01-13T09:26:14+5:30
US attack on Venezuela: "डोकं फुटतंय असं वाटलं..." - अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मादुरोच्या गार्डची पहिली प्रतिक्रिया, गुप्त शस्त्रांचा वापर...

अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
वॉशिंग्टन/काराकास: अमेरिकेच्या विशेष सैन्याने ३ जानेवारीच्या रात्री वेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ज्या पद्धतीने अटक केली, त्याचे थरारक तपशील आता समोर आले आहेत. मादुरो यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका रक्षकने या कारवाईचा असा काही अनुभव सांगितला आहे, जो ऐकून अंगावर काटा येईल. अमेरिकेने या मोहिमेत अशा काही गुप्त शस्त्रांचा वापर केला की, शेकडो सैनिक असूनही मादुरो हतबल झाले.
मादुरो यांच्या गार्डने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन विमानांचा आवाजही आला नाही आणि अचानक रडार यंत्रणा ठप्प झाली. "ते एखादं नरसंहार असल्यासारखं होतं. राष्ट्राध्यक्ष निवासाच्या बाहेर ५०० हून अधिक सैनिक तैनात होते, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. अमेरिकन सैनिकांच्या एका बंदुकीतून मिनिटाला ३०० गोळ्या सुटत होत्या," असे त्याने सांगितले.
विचित्र शस्त्र आणि रक्ताच्या उल्ट्या
गार्डने दावा केला की, काराकासमध्ये अमेरिकन सैनिक उतरण्यापूर्वी त्यांनी एका 'विचित्र' शस्त्राचा वापर केला. "अचानक एक मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकल्यानंतर असं वाटलं की डोकं आतून फुटून जाईल. आमच्या नाकातून रक्त वाहू लागलं आणि आम्ही रक्ताच्या उलट्या करू लागलो. सर्व सैनिक जमिनीवर कोसळले आणि कोणालाही साधी हालचाल करणंही शक्य नव्हते." अशा शब्दांत त्याने त्या 'सोनिक' किंवा 'सायलेंट' वेपनचा प्रभाव वर्णन केला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा व्हाईट हाऊसने या मोहिमेचा व्हिडिओ शेअर केला असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण मोहिमेत एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. मात्र, व्हेनेझुएलाच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अवघ्या ३० मिनिटांत मादुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकन विमाने न्यूयॉर्कच्या दिशेने झेपावली होती.