अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:08 IST2025-06-22T08:07:21+5:302025-06-22T08:08:12+5:30
US Attack On Iran Nuclear Site: अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे.

अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा
मागच्या आठ-दहा दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने थेट एंट्री करताना रात्री इराणमधील तीन प्रमुख अणुकेंद्रावर हल्ला केला. तसेच या हल्ल्यामध्ये इराणमधील फोर्डो या प्रमुख अणुकेंद्रासह नतांज आणि इस्फाहान या अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून हा इशारा देण्यात आला आहे.
इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी२ बॉम्बर्स विमानांकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच या हल्ल्यांसाठी शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर आता मध्य पूर्वेमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकन सैन्यदलांकडून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. हवाई दलाने इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बेचा वर्षाव केला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते.