अमेरिकेचे सैन्य दाखल; इराणचा इशारा, यूएस त्रिपोली युद्धनौका मध्यवर्ती कमांडच्या कार्यक्षेत्रात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 06:30 IST2026-03-29T06:29:18+5:302026-03-29T06:30:28+5:30
सौदीतील लष्करी तळावर इराणचा हल्ला, १५ अमेरिकी सैनिक जखमी, जहाजालाही केले लक्ष्य, इराणचे दावे अमेरिकेने फेटाळले, तर इस्रायलच्या ५० लढाऊ विमानांचा एअरस्ट्राइक, अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे टार्गेटवर

अमेरिकेचे सैन्य दाखल; इराणचा इशारा, यूएस त्रिपोली युद्धनौका मध्यवर्ती कमांडच्या कार्यक्षेत्रात दाखल
वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संघर्षाला दुसरा महिना सुरू होत असताना आता अमेरिकेने ३,५०० सैनिकांची कुमक तैनात केली आहे. या सैनिकांना घेऊन यूएस त्रिपोली ही युद्धनौका अमेरिकन मध्यवर्ती कमांडच्या कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा एकदा हल्ला चढवत म्हटले की, ते आता दादागिरी करणारे राहिलेले नाहीत. आज रात्री, आपण मध्य-पूर्वेच्या उदयाच्या पूर्वीपेक्षा अधिक जवळ आलो आहोत, जी अखेरीस इराणी दहशत, आक्रमकता आणि आण्विक धमक्यांपासून मुक्त झाली आहे. तर दुसरीकडे आमच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
इराणने सौदी अरेबियातील एका लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे १५ सैनिक जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इस्रालयनेही इराणवर लढाऊ विमानांच्या सहाय्याने जोरदार हल्ला केला. त्यानंतर इराणनेही पाच देशांवर जोरदार हल्ले चढविले.
इस्रायलवर येमेनमधून प्रथमच मारा
इस्रायलवर प्रथमच येमेनमधून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. शनिवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यातील क्षेपणास्त्र इस्रायलने पाडले. इराणचे पाठबळ असलेल्या हुथी बंडखोरांनी याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी ही माहिती दिली.
इराकची हवाई हद्द बंद
एका ड्रोनने इराकच्या मजनून तेलक्षेत्रावर शनिवारी हल्ला केला. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन इराकने हवाई हद्द ३१ मार्चपर्यंत बंद केली आहे.
संकटाचा सामना भारत खंबीरपणे करेल : मोदी
पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा भारत खंबीरपणे सामना करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करत असल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअज़ीज़ अल सऊद यांच्याशीही युद्धस्थितीबाबत चर्चा केली.
अमेरिकेला धमकी, ‘नरकात आपले स्वागत...’
इराणमधील 'तेहरान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने अमेरिकेला इशारा देत म्हटले आहे की, ‘नरकात आपले स्वागत आहे. जमिनीवरील कारवाईसाठी अमेरिकन सैन्य इराणमध्ये घुसले, तर ते शवपेट्यांमध्येच परत जातील.’ अमेरिकेकडून मध्य-पूर्वेत अंदाजे १०,००० अतिरिक्त सैन्य पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात तीन पत्रकारांचा मृत्यू
लेबनॉनमध्ये इस्रायलने शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात युद्धाचे वृत्तांकन करणाऱ्या तीन पत्रकारांचा मृत्यू झाला. तर गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात दोन पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला.
क्षेपणास्त्र अवशेष अंगावर पडले, ५ भारतीय जखमी
यूएईच्या हवाई संरक्षण प्रणालीने एक क्षेपणास्त्र निकामी केल्यानंतर त्याचे अवशेष खलिफा इकॉनॉमिक झोन अबू धाबी परिसरात शनिवारी पडून पाच भारतीय जखमी झाले, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. जखमी झालेल्या पाच भारतीयांपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले.
युद्धावर चर्चेसाठी तीन देश जाणार पाकिस्तानात
पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांसह विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कस्थानचे परराष्ट्रमंत्री उद्या, रविवारपासून पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. पाकचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे.
इराणचा शेजारी देशांवरही निशाणा; पाच देशांवर डागली क्षेपणास्त्रे अन् ड्रोन,
सौदी
सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर इराणने शनिवारी सहा क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. त्यातील दोन क्षेपणास्त्रे सौदी हवाई संरक्षण यंत्रणेने रोखली, तर उर्वरित चार अरबेयिन आखात आणि निर्जन भागात कोसळली.
यूएई
इराणने दुबईतील एका हॉटेलवर शनिवारी ड्रोन हल्ले केले. शुखैव पोर्ट येथे सहा अमेरिकन जहाजांना लक्ष्य करण्यात आले. यात तीन जहाजांचे मोठे नुकसान झाले तर तीन जहाजे बुडाली असा दावा इराणने केला आहे.
ओमान
ओमानमध्ये सलालाह बंदरावर इराणने शनिवारी दोन ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यात एक विदेशी कर्मचारी जखमी झाला. पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे हा या हल्ल्याचा उद्देश होता. या हल्ल्याचा ओमानने निषेध केला आहे.
कुवेत
कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात विमानतळाच्या रडार प्रणालीचे मोठे नुकसान झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बहरीन
इराणने लक्ष्य केलेल्या एका ठिकाणी लागलेली आग नागरी संरक्षण दलाने आटोक्यात आणली. बहरीन सरकारने देशात ड्रोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.