"बिनशर्त शरणागती पत्करा, तरच चर्चा"; ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, मेक इराण ग्रेटची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 20:44 IST2026-03-06T20:44:13+5:302026-03-06T20:44:53+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट शब्दात इशारा दिला आहे.

"बिनशर्त शरणागती पत्करा, तरच चर्चा"; ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, मेक इराण ग्रेटची घोषणा
Donald Trump On Iran: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून संघर्षाने अत्यंत वेगळे वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट शब्दात इशारा दिला आहे. "इराणसोबत कोणताही करार होणार नाही, जोपर्यंत ते बिनशर्त शरणागतीपत्करत नाहीत," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आखाती देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
'मेक इराण ग्रेट अगेन'; ट्रम्प यांची नवी रणनीती
ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटले की, इराणने शरणागती पत्करल्यानंतर तिथे नवीन आणि जगाला मान्य असेल असे उत्तम नेतृत्व निवडले जाईल. ट्रम्प यांनी केवळ इशाराच दिला नाही, तर इराणच्या भविष्यासाठी एक योजनाही मांडली आहे. ट्रम्प यांनी आपल्या प्रसिद्ध मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या धर्तीवर ट्रम्प यांनी इराणसाठी मेक इराण ग्रेट अगेन हा नारा दिला आहे.
आर्थिक मदतीचे आश्वासन
"शरणागतीनंतर आम्ही आणि आमचे मित्रराष्ट्र इराणला विनाशाच्या उंबरठ्यावरून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करू. इराण आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि समृद्ध होईल," असे आश्वासनही त्यांनी दिले.
सातव्या दिवशी युद्धाचे मैदान तापले
युद्ध सुरू होऊन सात दिवस उलटले असून दोन्ही बाजूंनी हल्ले तीव्र झाले आहेत. इस्रायली हवाई दलाने इराणमधील लष्करी तळ आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर सलग सातव्या दिवशी बॉम्बवर्षाव केला. तेल अवीवने दावा केला आहे की, त्यांनी इराणची संरक्षण यंत्रणा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली आहे.
इराणनेही इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी बलिदान पत्करू पण मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.
अमेरिकन नौदलाची युद्धनौका तैनात
भूमध्य समुद्रात अमेरिकेने आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने सज्ज ठेवली आहेत. ट्रम्प यांच्या विधानानंतर आता अमेरिका थेट युद्धात उतरणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशिया आणि चीनने अमेरिकेच्या शरणागतीच्या मागणीला विरोध केला असून, यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते असा इशारा दिला आहे.
इराणमध्ये सत्तांतराचे संकेत?
ट्रम्प यांच्या मान्य असलेले नेतृत्व या शब्दाचा अर्थ इराणमधील सध्याची राजवट उलथवून टाकणे असा काढला जात आहे. अमेरिकेला इराणमध्ये लोकशाही किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे सरकार हवे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.