उमर खालिदवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार खटला चालवा, ममदानी म्हणाले, खालिदची आम्हाला काळजी वाटते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:14 IST2026-01-03T11:13:22+5:302026-01-03T11:14:26+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या उमरवर सध्या यूएपीए कायद्यान्वये खटला सुरू आहे.

उमर खालिदवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार खटला चालवा, ममदानी म्हणाले, खालिदची आम्हाला काळजी वाटते
न्यूयॉर्क : आम्हाला तुझी काळजी वाटते, असे न्यूयॉर्कचे नवे महापौर झोहरान ममदानी यांनी फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच भारतामध्ये खालिद याच्यावर खटला न चालवता पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याला जामीन द्यावा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याच्या प्रकरणाची सुनावणी व्हावी, अशी मागणी अमेरिकेतील ८ लोकप्रतिनिधींनी भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांना एक पत्र लिहून केली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या उमरवर सध्या यूएपीए कायद्यान्वये खटला सुरू आहे. त्याला लिहिलेल्या पत्राची माहिती ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुरुवारी उघड केली. ते पत्र उमर याची सहकारी बनज्योत्स्ना लाहिरी हिने एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये दिले आहे. या पत्रात ममदानी यांनी उमर खालिद याला पाठिंबा व्यक्त केला आहे. कटुतेने आपल्यावर स्वार होऊ नये, याविषयी तू काढलेले उद्गार मला नेहमी आठवतात. न्यूयॉर्कमध्ये तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्हाला तुझी काळजी वाटते, असेही ममदानी यांनी या पत्रात म्हटले आहे.
‘ममदानी यांचा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप’
तुरुंगात असलेल्या उमर खालिदला पत्र लिहून न्यूयार्क शहराचे महापौर झोहरान ममदाननी यांनी भारताच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप केला आहे. असे प्रयत्न भारत अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा भाजपने शुक्रवारी दिला.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, जर भारताच्या सार्वभौमत्वावर कोणी बाहेरच्या व्यक्तीने आघात करण्याचा प्रयत्न केला तर ते भारतीय जनता कदापि सहन करणार नाही. भारतीय लोकांचा न्यायालयावर विश्वास आहे.
उमरविषयी त्याच्या आई-वडिलांची ममदानींशी चर्चा
उमर खालिद यांच्या आई-वडिलांनी मागील महिन्यात डिसेंबरमध्ये अमेरिकेचा दौरा केला. त्यांच्या धाकट्या मुलीचे लग्न होते. त्याला त्यांची थोरली मुलगी काही कारणाने उपस्थित राहू शकत नव्हती. त्यामुळे ते तिला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यावेळी उमरचे आई-वडील ममदानी यांना भेटले.