पाळीव कुत्र्यानं चाटलं, महिलेला जीवघेणा संसर्ग, हात-पाय कापावे लागले; आजाराचे नाव काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:30 IST2026-02-24T13:22:48+5:302026-02-24T13:30:59+5:30
ब्रिटनमधील मनजीत संघा या महिलेसोबत घडलेली ही घटना तुम्हाला धक्का देईल आणि विचार करायला लावेल. आपल्या पाळीव कुत्र्याने चाटल्यामुळे त्यांना असा जीवघेणा संसर्ग झाला की, त्यांना आपले दोन्ही पाय आणि हात गमवावा लागला.

पाळीव कुत्र्यानं चाटलं, महिलेला जीवघेणा संसर्ग, हात-पाय कापावे लागले; आजाराचे नाव काय?
पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रे हे मानवाचे सर्वात विश्वासू सोबती मानले जातात. अनेकजण आपल्या पाळीव कुत्र्यांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. मात्र, हेच प्रेम कधीकधी जीवावर बेतू शकते. ब्रिटनमधील मनजीत संघा नावाच्या ५२ वर्षीय महिलेला तिच्या कुत्र्याने चाटल्यामुळे असा काही संसर्ग झाला की, डॉक्टरांना तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकावे लागले.
जुलै २०२५ मध्ये मनजीत संघा कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्या बेशुद्ध पडल्या. त्यांचे हात-पाय थंड पडले होते, ओठ निळे झाले होते आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना सेप्सिस नावाचा जीवघेणा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
उपचारादरम्यान मनजीत यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. त्यांना तब्बल सहा वेळा हृदयविकाराचा झटका आला. शरीरातील संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर शस्त्रक्रिया करून त्यांचे गुडघ्याखालील दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापून टाकावे लागले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत यांच्या शरीरावर असलेल्या एका लहान जखमेला किंवा ओरखड्याला त्यांच्या कुत्र्याने चाटले होते. कुत्र्याच्या लाळेमध्ये 'कॅप्नोसाइटोफॅगा कॅनिमोरसस' नावाचा बॅक्टेरिया असतो. हा बॅक्टेरिया मानवी शरीरात गेल्यास अत्यंत गंभीर संसर्ग आणि सेप्सिस निर्माण करू शकतो.
सेप्सिस म्हणजे काय?
सेप्सिस ही एक अशी स्थिती आहे, जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाशी लढताना स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू लागते. यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होतो आणि अवयव निकामी होऊन मृत्यूचा धोका संभवतो.
सेप्सिसची लक्षणे
- खूप जास्त ताप किंवा शरीर थंड पडणे.
- हृदयाचे ठोके आणि श्वास घेण्याचा वेग वाढणे.
- लघवीचे प्रमाण कमी होणे आणि प्रचंड थकवा जाणवणे.
- त्वचेवर लाल किंवा काळे डाग पडणे.
प्राणी प्रेमींसाठी महत्त्वाच्या टिप्स
- तुमच्या शरीरावर कुठेही जखम, कट किंवा ओरखडा असेल तर कुत्र्याला तो भाग चाटू देऊ नका.
- कुत्र्याशी खेळल्यानंतर हात स्वच्छ धुवा आणि कोणत्याही लहान जखमेला ताबडतोब औषध लावून झाकून ठेवा.
- अचानक ताप येणे, थंडी वाजणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.