ट्रम्प यांच्या मदतीला बाकी कुणी आले नाही, पण UAE ने पुढाकार घेतला; इराणविरुद्ध मैदानात उतरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:31 IST2026-04-01T12:30:08+5:302026-04-01T12:31:10+5:30
Donald Trump America Iran War: ट्रम्प हे युद्ध थांबवण्याच्या मन:स्थितीत असताना संयुक्त अरब अमिरातीने इराणविरुद्ध मोर्चा उघडण्याची तयारी केल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांच्या मदतीला बाकी कुणी आले नाही, पण UAE ने पुढाकार घेतला; इराणविरुद्ध मैदानात उतरणार?
Donald Trump America Iran War: इराणमधील युरेनिअमचा साठा ताब्यात घेण्यासाठी व त्या देशाला अण्वस्त्र निर्मिती करण्यापासून रोखण्यासाठी इराणवर जमीनमार्गे थेट कारवाई करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या लष्कराला देण्याची व एप्रिलपर्यंत युद्ध संपविण्याची शक्यता आहे. तसे वृत्त अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. इराणकडे सुमारे ४०० किलो समृद्ध युरेनियम आहे, ज्याचा उपयोग ते अणुबॉम्ब बनवण्यासाठी करू शकतात असा अमेरिकेचा दावा आहे. एकीकडे इतके दिवस अनेक देशांना विनवण्या करून, इशारे देऊन कुणी ट्रम्प यांच्या मदतीला आले नाहीत. आता ट्रम्प हे युद्ध थांबवण्याच्या मन:स्थितीत असताना संयुक्त अरब अमिरातीने इराणविरुद्ध मोर्चा उघडण्याची तयारी केल्याची माहिती आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका लवकरच इराणमधून आपले सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करेल. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेला इराणसोबत कोणत्याही कराराची गरज नाही. अमेरिकी सैन्य पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणमधून माघार घेईल. इराणमधील 'सत्तापालटाचे' उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे, अमेरिका आता हा संघर्ष लांबवण्याच्या बाजूने नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी तडजोडीसाठीची अट काढून टाकली असली तरी, युद्ध संपण्यापूर्वी करार होऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले.
UAE इराणविरुद्ध मैदानात उतरणार?
मध्यपूर्वेतील युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्ध थांबवण्याच्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच, इराणसोबतचा संघर्ष आणखी चिघळू शकतो, अशी भीती निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाल्याने काही मीडियातून समोर येत असलेल्या रिपोर्टनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांना पूर्ण ताकदीनिशी मदत करण्याची तयारी करत आहे. या कृतीमुळे, इराणच्या थेट हल्ल्यांना तोंड दिल्यानंतर या संघर्षात सक्रियपणे सहभागी होणारा संयुक्त अरब अमिरात हा आखाती प्रदेशातील पहिला देश ठरेल.
जलमार्ग सुरक्षित करण्यासाठी सक्रीय लष्करी भूमिकेचा विचार
संयुक्त अरब अमिरातीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणचा असा विश्वास आहे की ते आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत आणि हा महत्त्वाचा सागरी मार्ग रोखून ते जागतिक अर्थव्यवस्थेलाही खाली खेचायला तयार आहेत. त्यांच्या तेल आणि वायू सुविधांवर वारंवार झालेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे आखाती देशांनी असा निष्कर्ष काढला आहे की इराणची आक्रमकता आता सहन केली जाऊ शकत नाही. सागरी सुरुंग हटवणे आणि इतर साहाय्यक सेवा पुरवणे यासह, हा जलमार्ग सुरक्षित करण्यासाठी देश लष्करी भूमिका कशी बजावू शकतो याचा सक्रियपणे विचार करत आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिराती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे, जो लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता देईल. UAE च्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर आशियाई लष्करी शक्तींना होर्मुझची सामुद्रधुनी बळजबरीने पुन्हा उघडण्यासाठी एक आघाडी तयार करण्याचे आवाहन केले आहे. ही सामुद्रधुनी या आखाती राष्ट्राच्या ऊर्जा निर्यात, जहाज वाहतूक उद्योग आणि अन्न पुरवठ्यासाठी जीवनरेखा आहे.