विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:17 IST2025-08-07T13:15:40+5:302025-08-07T13:17:20+5:30
Sudan News: सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुदानमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या विमानामध्ये कोलंबियाचे भाडोत्री सैनिक होते. तसेच या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. ज्या न्याला विमानतळावर हा हल्ला करण्यात आला तो रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या ताब्यात आहे. तसेच सुदानचं लष्कर आमि आरएसएफ यांच्यामध्ये एप्रिल २०२३ पासून संघर्ष सुरू आहे.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिरातीचं हे विमान न्याला विमानतळावर उतरताच त्याच्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये पूर्णपणे नष्ट झालं आहे. हे विमान आखाती देशांमधील कुठल्यातरी विमानतळावरून उडाले होते. तसेच त्यामध्ये अनेक परदैशी सैनिक आणि आरएसएफसाठीची हत्यारे आणि उपकरणे होती, असा दावा सुदानच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे.
संयुक्त अरब अमिरातीकडून न्याला विमानतळाच्या माध्यमातून आसएसएफला ड्रोनसारख्या हत्यारांचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप जनरल अब्देल फतह अल बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सुदानच्या सैन्याकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्ताव पेट्रो यांनी सांगितले की, ‘’कोलंबियाचं सरकार हे या हल्ल्यात किती कोलंबियन मारले गेले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे मृतदेह परत आणता येतील का, याची चाचपणी करत आहोत. पेट्रो यांनी भाडोत्री सैनिकांच्या वापरावर बंदी घालण्याचेही संकेत दिले आहेत’’. कोलंबियामधून येणारे भाडोत्री सैनिक हे बहुतांशी माजी सैनिक किंवा गनिमी काव्याने लढणारे सैनिक असतात. असे सैनिक आधीही येमेन आणि आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीसाठी लढले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनीही २०२४ च्या अखेरीस दार्फुरमध्ये कोलंबियन सैनिक असल्याचा वृत्तास दुजोरा दिला होता.