पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:01 IST2026-04-03T12:00:08+5:302026-04-03T12:01:25+5:30
युएईने पाकिस्तानला १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करण्यास सांगितले आहे. इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थी करणे पाकिस्तानला महागात पडल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
आर्थिक डबघाईला आलेला आणि नेहमीच हातामध्ये कटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानला आता सौदी अरेबियानंतर त्यांचा सर्वात जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीने मोठा झटका दिला आहे. मध्य पूर्वेतील इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर, युएईने पाकिस्तानला दिलेले २ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १६,००० कोटी रुपये) कर्ज १७ एप्रिलपर्यंत व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, युएईने या कर्जावरील व्याजदर ३ टक्क्यांवरून थेट ६.५ टक्के इतका वाढवला आहे.
युएई का संतापले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पाकिस्तान तुर्की आणि इजिप्तसारख्या देशांशी चर्चा करत आहे. मात्र, युएईची भूमिका याच्या उलट आहे. युएईला वाटते की, ट्रम्प प्रशासनाने इराणची दादागिरी कायमची संपवावी. पाकिस्तान इराणला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने युएईने आता पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे.
पुतिन यांची 'पीस मेकर' म्हणून एन्ट्री!
दुसरीकडे, स्वतःला मोठे शांतीदूत समजणाऱ्या पाकिस्तानला रशियानेही धक्का दिला आहे. अमेरिका आणि इराणमधील शांतता करारातून पाकिस्तानला बाजूला सारून आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या प्रकरणाची कमान हाती घेतली आहे. रशियाने स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्वेतील शांततेसाठी पुतिन स्वतः एका मोठ्या प्लॅनवर काम करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.
ट्रम्प यांची अट आणि जे.डी. व्हॅन्स यांची चर्चा
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांनी मंगळवारी पाकिस्तानी मध्यस्थांशी चर्चा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार, व्हॅन्स यांनी संकेत दिले आहेत की अमेरिका युद्धविरामासाठी तयार आहे, परंतु त्यांच्या काही अटी आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे इराणच्या ताब्यात असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे ही आहे.
पाकिस्तानची कोंडी
एकीकडे देशात अन्नान्न दशा असताना आणि परकीय चलनाचा साठा संपलेला असताना, १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स उभे करणे पाकिस्तानसाठी अशक्यप्राय आहे. जर पाकिस्तानने हे पैसे दिले नाहीत, तर युएईसोबतचे संबंध कायमचे बिघडण्याची शक्यता आहे. इराणला साथ द्यावी की युएईचे पैसे भरावे, अशा दुहेरी संकटात सध्या पाकिस्तान अडकला आहे.