हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 07:41 IST2025-10-20T07:41:23+5:302025-10-20T07:41:42+5:30
Hong Kong Cargo Plane Skid: दुबईहून हाँगकाँगला पोहोचलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३:५० वाजता उत्तर दिशेकडील धावपट्टीवर उतरत होते.

हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे एक अत्यंत दुर्मिळ आणि भीषण अपघात घडला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोंदणीकृत असलेले एक कार्गो विमान धावपट्टीवरून घसरले आणि थेट समुद्रात कोसळले.
दुबईहून हाँगकाँगला पोहोचलेले हे विमान स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३:५० वाजता उत्तर दिशेकडील धावपट्टीवर उतरत होते. रनवेवर लँडिंग सुरू असताना, सुमारे ९० किलोमीटर प्रति तास (४९ नॉट्स) वेगाने असलेले हे विमान एका वाहनाशी धडकले आणि पुढे सरकले.
अपघातात दोन जण ठार
या अपघातात विमानातील चार क्रू मेंबर सुरक्षित बचावले आहेत, मात्र त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, या धडकेमुळे विमानतळावर कार्यरत असलेले दोन ग्राउंड स्टाफ समुद्रात फेकले गेले. त्यांना तातडीने वाचवण्यात आले असले तरी, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. हाँगकाँग सरकारच्या फ्लाइंग सर्विसचे हेलिकॉप्टर आणि फायर सर्विस विभागाच्या बोटी बचाव कार्यात सामील झाल्या होत्या.
सुरक्षिततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हाँगकाँग विमानतळावर हा अपघात एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. घटनेनंतर, अपघातामुळे प्रभावित झालेला उत्तर दिशेकडील रनवे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.