Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:13 IST2025-11-07T16:12:03+5:302025-11-07T16:13:43+5:30
Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. व्हिएतनामच्या जिया लाई आणि जवळच्या परिसरात घरं कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेपत्ता आहेत. कलमेगी हे व्हिएतनाममध्ये आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक मानलं जातं. ज्यामध्ये १४९ किमी/ताशी वेगाने वारे वाहू लागले, त्यात आधीच पूरग्रस्त भागात सतत पाऊस पडत आहे.
व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते अजूनही नुकसानीचं मूल्यांकन करत आहेत. दरम्यान, व्हिएतनामच्या पर्यावरण मंत्रालयाने वृत्त दिलं की ५७ घरं कोसळली आहेत आणि सुमारे २,६०० घरांचं नुकसान झालं आहे, ज्यामध्ये जिया लाईमध्ये २,४०० हून अधिक घरांचा समावेश आहे. सरकारी मीडियानुसार, डाक लाकमध्ये तीन आणि जिया लाई प्रांतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर क्वांग न्गाईमध्ये तीन जण बेपत्ता आहेत.
Saatte 148 km hıza ulaşan Kalmaegi Tayfunu, Vietnam’da hayatı durma noktasına getirdi. pic.twitter.com/9JfEgOMIP5
— Whisper (@whisperhaber) November 7, 2025
व्हिएतनाममधील बाधित भागातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात वादळामुळे झालेलं मोठं नुकसान स्पष्टपणे दिसून आलं आहे. एका व्हिडिओमध्ये एक माणूस जोरदार वाऱ्यामुळे आपली स्कूटर रस्त्यात सोडून भिंतीजवळ आश्रय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा वेग इतका जोरदार होता की त्याला असं वाटलं की तो उडून जाईल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बिन्ह दिन्ह प्रांतात समुद्राचे पाणी लोकांच्या घरात शिरताना दिसत आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला फिलीपिन्समध्ये कलमेगीने कहर केला, ज्यामुळे भूस्खलन झाले. वादळामुळे तेथे १८८ लोकांचा मृत्यू झाला आणि १३५ लोक अजूनही बेपत्ता आहेत. फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी गुरुवारी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की तापमानवाढीमुळे आग्नेय आशियामध्ये वादळे आणि पाऊस पडत आहे, ज्यामुळे विनाश होत आहे.