व्हिएतनाममधील नागरिकांवर एक मोठं संकट आलं आहे. यामुळे आता त्यांना आपलं घर देखील सोडावं लागणार आहे. व्हिएतनाममध्ये या वर्षातील सर्वात शक्तिशाली काझीकी चक्रीवादळ आज धडकणार आहे. हवामान खात्यानुसार, हे वादळ ताशी १७५ किमी वेगाने व्हिएतनामच्या मध्य किनारपट्टीकडे सरकत आहे. जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील सर्व विमानतळ आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. व्हिएतनाम एअरलाईन्स आणि व्हिएतजेटने २२ हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
लाखो लोकांना स्थलांतर करण्याचे आदेश!या वादळाच्या धोक्यामुळे चार प्रांतांतील ५.८६ लाख लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. थान होआ, क्वांग त्रि, ह्यू आणि दानंग येथील १.५० लाखाहून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काझीकी चक्रीवादळ दक्षिण चीन समुद्रात पुढे सरकत असून, किनारपट्टीवरील विन्ह शहरात वादळ धडकण्यापूर्वीच रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. सात किनारी प्रांतांनी समुद्रात मासेमारी करण्यास मनाई केली आहे. बचावकार्यासाठी २१ हजार कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.
यागी वादळाने केले होते मोठे नुकसानमागील वर्षी व्हिएतनाममध्ये 'यागी' वादळ आले होते, ज्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या वादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे २०० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे व्हिएतनामला सुमारे ३.३ अब्ज डॉलर्सचे (सुमारे २.७४ लाख कोटी रुपये) नुकसान झाले होते.
चीनमध्येही काझीकीचा परिणामजुलै महिन्यापासून चीनच्या उत्तर आणि दक्षिण भागांत विक्रमी पाऊस पडत आहे. काझीकी चक्रीवादळ चीनच्या हैनान बेटावरून देखील जाण्याची शक्यता आहे. येथे २० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सान्या शहरातील पर्यटन स्थळे, शाळा, दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. सान्या हे चीनमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जेथे मागील वर्षी ३.४ कोटी पर्यटक आले होते.