नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:03 IST2025-10-06T07:03:30+5:302025-10-06T07:03:52+5:30
नेपाळमध्ये देवी निवडले जाण्याचे नियमही अतिशय कडक आहेत. २०१७ मध्ये ‘देवी’चं पद स्वीकारलेल्या तृष्णा शाक्यनं गेल्या महिन्यात देवीचं पद सोडलं होतं. आता ती ११ वर्षांची आहे. परंपरेनुसार, जेव्हा देवीला मासिक धर्म सुरू होतो, तेव्हा तिला हे पद सोडावं लागतं.

नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
नेपाळमध्ये देवीची परंपरा अतिशय महत्त्वाची मानली जाते. काठमांडू (राजकीय कुमारी), पाटन (ललितपूर) आणि भक्तपूर या शहरांत ही परंपरा प्रामुख्यानं पाळली जाते. या प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी देवी निवडल्या जातात. त्यांना जिवंत देवीचा दर्जा दिला जातो. आर्यतारा ही दोन वर्षांची मुलगी नुकतीच काठमांडूची नवी देवी म्हणून निवडली गेली आहे. तृष्णा शाक्य या पूर्वीच्या देवीच्या जागी आता तिनं घेतली आहे.
नेपाळमध्ये देवी निवडले जाण्याचे नियमही अतिशय कडक आहेत. २०१७ मध्ये ‘देवी’चं पद स्वीकारलेल्या तृष्णा शाक्यनं गेल्या महिन्यात देवीचं पद सोडलं होतं. आता ती ११ वर्षांची आहे. परंपरेनुसार, जेव्हा देवीला मासिक धर्म सुरू होतो, तेव्हा तिला हे पद सोडावं लागतं.
नेपाळमध्ये देवीची निवड नेवार समाजातील शाक्य कुलातून केली जाते. काठमांडू खोऱ्यातील ते मूळ रहिवासी आहेत. देवी म्हणून निवड केली जाणाऱ्या मुलीत ३२ गुण असणं आवश्यक आहे. सुंदर चेहरा, शुद्ध शरीर, शांत मन, दैवी तेज, डाग किंवा जखमा नसलेलं शरीर, अंधाराला न घाबरणं, स्वच्छ दात आणि विलक्षण धैर्य.. हे त्यातले काही गुण.
निवडलेली देवी ही देवी तलेजूचं जिवंत रूप मानली जाते. देवीला नेहमी लाल कपडे घातले जातात, कपाळावर ‘तिसऱ्या डोळ्याचा’ ठिपका लावला जातो. देवी होण्यासाठी मुलीला धैर्याची परीक्षा द्यावी लागते. ती थोडी जरी घाबरली, तर तिला देवीचा अवतार मानलं जात नाही. निवडलेली देवी आपल्या कुटुंबापासून वेगळी राहते आणि कुमारी भवनमध्ये राहते. देवीला खूप पवित्र मानलं जातं. भक्तांशी त्या शांतपणे इशाऱ्यांत बोलतात.
देवीचं रडणं अशुभ मानलं जातं. २००१ मध्ये देवी चनीरा बज्राचार्य चार दिवस रडत होती. तिच्या रडण्याच्या शेवटच्या दिवशी १ जून २००१ रोजी युवराजानं राजा बीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह शाही परिवारातील नऊ लोकांची हत्या केली आणि स्वतःवरही गोळी झाडली.
या घटनेनंतर देवी चनीरानं माध्यमांना सांगितलं होतं, मला अचानकच रडू यायला लागलं. मी विनाकारण रडायला लागले. आईनं मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी थांबले नाही. त्याचवेळी पुजाऱ्यानं सांगितलं होतं, हा काहीतरी अशुभ संकेत आहे. चौथ्या दिवशी राजघराण्याच्या हत्येची बातमी आली.
शाक्य वंशात ‘देवी’ बनण्यासाठी मुलींना तयार केलं जातं आणि यासाठी स्पर्धा होते. देवी बनल्यानं कुटुंब आणि कुलाला समाजात उच्च स्थान मिळतं. काठमांडूच्या प्राचीन ‘कुमारी भवन’मध्ये या देवी राहतात. वर्षातून केवळ काही विशेष सण आणि धार्मिक मिरवणुकीच्या वेळीच त्या बाहेर येतात. नेपाळी लोककथेनुसार, ज्या पुरुषांचा विवाह पूर्वीच्या देवीसोबत होतो त्यांचा लवकर मृत्यू होतो, त्यामुळे अनेक पूर्व देव्या अविवाहित राहतात. देवी निवडीची परंपरा बाराव्या शतकापासून मल्ला राजवंशापासून चालू आहे. कुमारी देवीला पाहिल्यानं भक्तांना सौभाग्य मिळतं, असं म्हटलं जातं.
आर्यताराचे वडील अनंत शाक्य म्हणाले, कालपर्यंत ती माझी मुलगी होती, पण आज ती देवी आहे. गर्भावस्थेत माझ्या पत्नीला स्वप्न पडलं होतं की तिच्या गर्भात देवी आहे. त्याच वेळी आम्हाला कळलं होतं की तिच्यात काहीतरी खास आहे!