अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:41 IST2025-05-22T09:41:29+5:302025-05-22T09:41:50+5:30
हल्लेखोर गोळीबारावेळी 'फ्री पॅलेस्टाईन' असे ओरडत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एकजण आत आला आणि त्याने ही घटना पाहिल्याचे सांगितले.

अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकी ज्यूइश समितीचा कार्यक्रम सुरु असलेल्या एका म्युझिअमबाहेर इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. नॉर्थवेस्ट डीसी येथील एफबीआयच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिसपासून काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली.
वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल ज्यूइश म्युझियमबाहेर हा गोळीबार झाला. यात दोन इस्रायली कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी गृह सुरक्षा विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी केली. आज रात्री इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आम्ही सक्रियपणे चौकशी करत आहोत आणि अधिक माहिती सामायिक करण्यासाठी काम करत आहोत. कृपया पीडितांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा.
हल्लेखोर गोळीबारावेळी 'फ्री पॅलेस्टाईन' असे ओरडत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एकजण आत आला आणि त्याने ही घटना पाहिल्याचे सांगितले. तसेच पाणी मागू लागला. लपण्यासाठी जागा हवीय असे देखील म्हणाला, असे अन्य प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत डीसी रुग्णालयात नेण्यात आले होते, असे एबीसी न्यूजने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी याला ज्यूंविरुद्ध दहशतवादी कृत्य म्हटले आहे. तसेच लाल रेषा ओलांडल्याचे म्हटले आहे. हा हल्ला झाला तेव्हा तिथे इस्रायली राजदूत उपस्थित नव्हते, असे इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले. हे म्युझिअम २०२३ मध्ये सुरु करण्यात आले होते.