या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अॅक्शनमोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:13 IST2025-07-19T12:00:58+5:302025-07-19T12:13:18+5:30
पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशात त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला.

या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अॅक्शनमोडवर
पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशातील डोसो प्रदेशात १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. नियामी येथील भारतीय दूतावासाने या घटनेची माहिती दिली. तसेच पीडित कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात भारतीय दूतावासाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. "१५ जुलै रोजी नायजरच्या डोसो प्रदेशात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आणि एकाचे अपहरण झाले. आम्ही शोकाकुल कुटुंबांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. मृतांचे मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी आणि अपहरण केलेल्या भारतीय नागरिकाची सुरक्षित सुटका करण्यासाठी नियामीमधील आमचे मिशन स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे, असं या निवेदात म्हटले आहे.
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नियामीपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या दोस्सो प्रदेशातील एका विद्युत लाईनच्या बांधकामाच्या ठिकाणी हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बांधकाम स्थळाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या नायजर सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात एक नायजर सैनिकही ठार झाल्याचे वृत्त आहे.
मृतांपैकी एकाची ओळख पटली असून तो झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील ३९ वर्षीय स्थलांतरित कामगार आहे. तर दुसऱ्या मृताचे नाव कृष्णन आहे, तो दक्षिण भारतातील होता. अपहरण झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव रणजीत सिंग आहे, तो मूळचा जम्मू आणि काश्मीरचा आहे आणि ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
घरी परतण्याच्या तयारीत
गणेश करमाळी यांच्या कुटुंबीयांच्या माहतीनुसार, त्यांचा मेहुणा प्रेमलाल करमाळीही त्याच ठिकाणी काम करत होता आणि त्यांना गोळी लागली आहे. सध्या तो नायजरमध्ये पोलिस संरक्षणाखाली आहे, झारखंडमधील इतर चार स्थलांतरित कामगारांसह जे सुरक्षित आहेत आणि घरी परतण्याच्या तयारीत आहेत.