F-16 Fighter Jet Crashes: उड्डाणानंतर अवघ्या ६ मिनिटांत एफ-१६ फायटर जेट क्रॅश, पायलटचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:36 IST2026-02-25T09:35:56+5:302026-02-25T09:36:36+5:30
Turkey F-16 Fighter Jet Crashes: तुर्की हवाई दलाचे एक एफ-१६ लढाऊ विमान मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

F-16 Fighter Jet Crashes: उड्डाणानंतर अवघ्या ६ मिनिटांत एफ-१६ फायटर जेट क्रॅश, पायलटचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
तुर्की हवाई दलाचे एक एफ-१६ लढाऊ विमान मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालिकेसिर प्रांतात झालेल्या या भीषण अपघातात विमानातील वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत पुष्टी दिली. तुर्की हवाई दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्र्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचाव पथके अद्याप घटनास्थळी तपास करत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेसिर येथील ९ व्या मेन जेट बेस कमांडवरून मंगळवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सुमारे ००:५० वाजता या विमानाने नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या ६ मिनिटांत म्हणजेच ००:५६ वाजता विमानाचा रडार आणि नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. विमानाचा संपर्क तुटताच तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. इस्तंबूल-इझमीर महामार्गाजवळील कारेसी परिसरात विमानाचे अवशेष जमीनीवर पडल्याचे आढळले. तर, पायलट मृतावस्थेत आढळला.
Turkish MoD confirms F-16 crash — pilot killed
— RT (@RT_com) February 25, 2026
Radio contact was lost during a mission with an F-16 that took off from Balıkesir
Search teams recovered the wreckage — investigations into the cause are underway pic.twitter.com/fjT0tP13FA
बालिकेसीरचे गव्हर्नर इस्माइल उस्ताओग्लू यांनी सोशल मीडियावरून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, "मिशन फ्लाइट दरम्यान आमचे एक एफ-१६ विमान कोसळले असून, यात आमच्या एका शूर वैमानिकाला वीरमरण आले. मी शहिदाच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो."
एफ-१६ विमाने तुर्कीच्या हवाई संरक्षणाचा कणा मानली जातात. या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण, याचा शोध घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक विशेष टीम तयार केली आहे. बालिकेसीर रिपब्लिकन अभियोक्त्यानेही या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे.