ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 05:37 IST2025-10-12T05:36:24+5:302025-10-12T05:37:00+5:30
एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता.

ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
वॉशिंग्टन : चीनवर १०० टक्के अतिरिक्त आयात कर लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम अनपेक्षितपणे अमेरिकेच्या शेअर बाजारावर शुक्रवारी दिसून आला. बाजारामध्ये सर्वत्र घसरण दिसून आली. डाऊ निर्देशांक ८७९ अंशाने (१.९%), एस अँड पी ५०० अंशाने (२.७%) व नॅसडॅक ३.५६ टक्क्याने घसरला.
तब्बल १.५६ ट्रिलियन डॉलरचा फटका
एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता.
एस अँड पीच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १.५६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. एनविडिया व ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइस यांच्या समभागात ४.९५ व ७.७८ टक्के घसरण झाली. अमेरिकेत तेलाच्या किमतीत ४.२ टक्क्याने वाढ झाली तर ब्रेटन क्रूड ३.८ टक्क्याने घसरला. शेअर बाजारातील ही मे नंतरची सर्वाधिक घसरण मानली जात आहे.
टॅरिफवरून चीनशी तणाव वाढत चालल्याचे हे लक्षण असून बाजारपेठेला हा अनपेक्षित धक्का असल्याची प्रतिक्रिया अर्थ विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.