ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:53 IST2026-01-14T12:51:55+5:302026-01-14T12:53:34+5:30
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा जगातील सर्वात मोठ्या बेटाकडे, म्हणजेच 'ग्रीनलँड'कडे वळवला आहे.

ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि अजब मागण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा जगातील सर्वात मोठ्या बेटाकडे, म्हणजेच 'ग्रीनलँड'कडे वळवला आहे. मात्र, ग्रीनलँडचे पंतप्रधान जेंस-फ्रेडरिक नील्सन यांनी ट्रम्प यांची ही मागणी पायदळी तुडवत त्यांना अत्यंत कडक शब्दांत सुनावले आहे. "ग्रीनलँड हा एक स्वतंत्र देश असून तो कोणत्याही व्यवहारासाठी किंवा विकण्यासाठी ठेवलेला नाही," अशा शब्दांत नील्सन यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा धिक्कार केला.
"आम्हाला अमेरिकन व्हायचं नाही!"
पंतप्रधान जेंस-फ्रेडरिक नील्सन यांनी स्पष्ट केले की, ग्रीनलँड डेन्मार्क साम्राज्यासोबत एकनिष्ठ आहे आणि नाटो युतीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. "आम्हाला अमेरिकन व्हायचे नाही किंवा पूर्णपणे डॅनिशही राहायचे नाही. आम्हाला फक्त 'ग्रीनलँडर' म्हणून आमची ओळख जपायची आहे. आमचा देश, आमची माणसं आणि आमचं भविष्य ठरवण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे," असे नील्सन यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता त्यांनी आपली स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांचा ग्रीनलँडवर डोळा का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच ग्रीनलँड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी डेन्मार्कसोबत मोठा व्यवहार करण्याची तयारीही दर्शवली होती. ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. तिथे मोठ्या प्रमाणात दुर्मिळ खनिजे, युरेनियम आणि नैसर्गिक संसाधने दडलेली आहेत. तसेच, आर्क्टिक क्षेत्रात रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेला ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आवश्यक वाटत आहे.
"सरळ मार्गाने नाही तर..." ट्रम्प यांची धमकी?
ट्रम्प यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत की, जर हा व्यवहार शांततेने किंवा पैशांच्या जोरावर झाला नाही, तर अमेरिका 'इतर मार्गांचा' अवलंब करेल. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईनंतर ट्रम्प यांच्या या विधानाला जागतिक पातळीवर गांभीर्याने घेतले जात आहे. अमेरिकन संसदेतही ग्रीनलँडला ५१ वे राज्य बनवण्यासंदर्भात विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे युरोप आणि अमेरिकेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
डेन्मार्कचा इशारा: हा नाटोचा अंत ठरेल
दुसरीकडे, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनीही अमेरिकेला ताकीद दिली आहे. ग्रीनलँडवर कोणत्याही प्रकारचा जबरदस्तीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास, तो नाटो युतीसाठी घातक ठरेल आणि जागतिक संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.