डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 08:18 IST2026-01-10T08:18:02+5:302026-01-10T08:18:42+5:30
Trump Venezuela Crude oil to India News : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण जाहीर केले आहे. तेल कंपन्यांसोबत १०० अब्ज डॉलर्सचा करार आणि भारतासाठी स्वस्त तेलाची संधी. वाचा सविस्तर बातमी.

डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे. व्हेनेझुएलातील राजकीय उलथापालथीनंतर आता तिथला अफाट तेलसाठा भारतासारख्या देशांना विकण्यासाठी ट्रम्प प्रशासन सज्ज झाले आहे. एका विशेष 'वॉशिंग्टन नियंत्रित फ्रेमवर्क' अंतर्गत हे तेल भारताला उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होण्याची चिन्हे आहेत.
व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईनंतर तिथल्या तेल क्षेत्रावर अमेरिकेने प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी स्पष्ट केले की, व्हेनेझुएलातील सुमारे ३ ते ५ कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी काढला जाईल. विशेष म्हणजे, या विक्रीतून येणारा पैसा थेट अमेरिकेच्या नियंत्रणाखालील खात्यांमध्ये जमा होईल, ज्याचा वापर भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि व्हेनेझुएलाच्या जनतेच्या कल्याणासाठी केला जाईल असा दावा अमेरिकेने केला आहे.
ट्रम्प यांनी या बैठकीत दावा केला की, अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनासाठी किमान १०० अब्ज डॉलर्स (सुमारे ८.३ लाख कोटी रुपये) खर्च करतील. व्हेनेझुएलातील तेल विहिरी आणि रिफायनरींची दुरवस्था झाली असून, अमेरिकन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या पुन्हा उभ्या केल्या जाणार आहेत. कोणत्या कंपन्यांना तिथे प्रवेश मिळेल, याचा अंतिम निर्णय स्वतः ट्रम्प घेणार आहेत.
भारताला कसा होणार फायदा?
रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियन तेलावर निर्बंधांची टांगती तलवार असताना, व्हेनेझुएलाचे तेल भारतासाठी एक मोठा आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. भारतीय रिफायनरीज (विशेषतः जामनगरमधील) व्हेनेझुएलाच्या 'हेव्ही क्रूड'वर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. ओएनजीसी विदेश लिमिटेडचे व्हेनेझुएलामध्ये अडकलेले सुमारे १ अब्ज डॉलर्स परत मिळण्याचा मार्ग या नवीन व्यवस्थेमुळे मोकळा होऊ शकतो. परंतू, यासाठी भारताला थेट व्हेनेझुएलाशी नाही तर अमेरिकेसोबत व्यवहार करावा लागणार आहे, अन्यथा भारताला तेल मिळणार नाही.
रशियासाठी धोक्याची घंटा?
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय भारताला रशियापासून दूर नेण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारताला रशियन तेल खरेदी कमी करण्यासाठी इशारा दिला होता. आता व्हेनेझुएलाचा पर्याय देऊन अमेरिका भारताची रशियावरील निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.