भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:42 IST2025-08-29T19:41:33+5:302025-08-29T19:42:29+5:30
Trump Tariff News: भारत-पाकिस्तान युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे दावे फेटाळून लावल्यामुळे भारतावर कर लादला.

भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. यातील २५% कर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे लावण्यात आला आहे. या जाचक करामुळे अनेक देशांनी ट्रम्प यांच्या कृतीचा निषेध केला आहे. दरम्यान, आता अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या एका अहवालातून एक धक्कादायक दावा केला आहे.
नोबेलची संधी गमावली
'भारतानेडोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानसोबत केलेल्या युद्धविरामाचे श्रेय दिले नाही, त्यामुळेच अमेरिकेने भारतावर कर लादला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या कराचा रशियन तेल खरेदीशी काहीही संबंध नाही,' असा दावा त्यात करण्यात आला आहे. तसेच, 'ट्रम्प यांना आशा होती की, भारत अमेरिकेला मध्यस्थीचे श्रेय देईल, मात्र भारताने हस्तक्षेपास नकार दिला. त्यामुळे ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची संधी गमावली."
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
ट्रम्प यांची वैयक्तिक नाराजी...
या अहवालात असेही म्हटले आहे की, शेती आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिकेमध्ये कोणतीही समस्या नाही. अमेरिकेला माहित आहे की भारत कधीही या क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही, कारण भारतातील लाखो लोक यावर अवलंबून आहेत. हे कर प्रामुख्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 'वैयक्तिक नाराजी'चे परिणाम आहेत, असा दावाही यात करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या विनंतीने युद्धविराम
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर जोरदार हल्ले केले. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर शेवटी पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने युद्धविराम जाहीर केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केल्यामुळे युद्धविराम केल्याचा दावा केला होता. पण, भारताने प्रत्येक वेळी त्यांचे दावे फेटाळून लावले.