Donald Trump Putin Meeting: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास बैठक चालली. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावर जोर दिला गेला. याच भेटीवेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना एक पत्र दिले. हे पत्र होते मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले. हे पत्र पुतीन यांच्यासाठीच लिहिले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी या पत्राच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ट्रम्प पुतीन भेटीवेळी मेलानिया ट्रम्प या उपस्थित राहू शकल्या नाही, पण त्यांनी पुतीन यांच्यासाठी एक पत्र लिहिले. हे पत्र ट्रम्प यांनी पुतीन यांना दिले.
मेलानियांनी पुतीन यांना लिहिलेल्या पत्रात काय?
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्लोव्हेनियामध्ये जन्मलेल्या मेलानिया अलास्का दौऱ्यावर राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत येऊ शकल्या नाही. त्यामुळे त्यांनी पुतीन यांचे पत्रातून एका मुद्द्याकडे लक्ष वेधले. युद्ध काळात युक्रेन आणि रशियातील लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात अपहरण सुरू आहे. याबद्दल त्यांनी पुतीन यांच्याकडे चिंता व्यक्त केली.
युक्रेन सरकारचा दावा काय?
युक्रेन सरकारच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यापासून कमीत कमी १९५०० मुलांना घेऊन जाण्यात आले आहे. या मुलांना रशिया किंवा रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भागात नेण्यात आले असावे, असा युक्रेन सरकारचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने २०२३ मद्ये मुलांना बेकायदेशीरपणे घेऊन जाण्याच्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि त्यांच्या बाल अधिकार आयुक्त मारिया ल्वोवा बेलोव्हा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.