Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:23 IST2025-09-30T09:20:48+5:302025-09-30T09:23:24+5:30
Donald Trump gaza war Peace Plan: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास आणि इस्रायलमधील युद्ध रोखण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. ट्रम्प यांचा शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा प्लॅन काय आहे?

Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
Trump, US peace plan for gaza: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेलं गाझा युद्ध थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्लॅन तयार केला आहे. व्हाईट हाऊसने हा प्लॅन जाहीर केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंन्जामिन नेतन्याहूंनीही या प्लॅन सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने गाझा पट्टीचा नवीन नकाशा तयार केला असून, नव्या प्लॅननुसार गाझा आणि इस्रायलच्या मध्ये कायमस्वरुपी बफर झोन तयार केला जाणार आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इस्रायल आणि इतर देशांनी अमेरिकेने तयार केलेला प्लॅन मान्य केला आहे.
ट्रम्प म्हणाले, "जर हमासने हा प्लॅन स्वीकारला, तर या प्रस्तावानुसार उर्वरित सर्व ओलिसांना तात्काळ सोडण्याची तरतूद केली गेली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत ७२ तासांपेक्षा जास्त काळ यासाठी लागणार नाही."
ट्रम्प यांच्या प्लॅननुसार हमासला सर्व जिवंत आणि मृत ओलिसांना सोडावं लागेल. हमासने इस्रायलच्या नागरिकांना ओलिस ठेवलेले आहे. यातील काही जणांची सुटका करण्यात आली होती. पण, परत युद्ध भडकले. त्यानंतर अजून काही लोक हमासच्या तावडीत आहे. त्याचबरोबर इस्रायलनेही काही लोकांनी पकडलेले आहे.
इस्रायल-गाझा सीमेवर तयार केला जाणार बफर झोन
राष्ट्रपती ट्रम्प यांनी प्रसिद्ध केलेल्या नकाशावर तीन रेषा आहेत. निळी, पिवळी आणि लाल. त्यानंतर बफर झोन आहे.
निळ्या रेषेचा अर्थ असा की, या रेषेपर्यंतचा भाग अजून इस्रायलच्या लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. ही रेषा युनूस खानजवळ आहे.
त्यानंतर राफाजवळून पिवळी रेषा जाते. याला पहिली माघार रेषा म्हटले गेले आहे. या पिवळ्या रेषेचा अर्थ ओलिसांना सोडण्याबरोबरच इस्रायलचे लष्कर पिवळ्या रेषेपर्यंत येईल.
त्यानंतर दुसरी माघार लाईन आहे. लाल रेषेचा अर्थ आहे की, दुसऱ्यांदा माघार घेतल्यानंतर इस्रायलचे लष्कर इथे येऊन थांबेल. त्यानंतर बफर झोन सुरू होतो. तिसऱ्यांदा माघार घेतल्यानंतर इस्रायलचे लष्कर बफर झोनच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे इस्रायलच्या हद्दीत परतेल.
बफर झोनचा अर्थ असा की, हा झोन इस्रायल आणि पॅलेस्टाईन लोकांना पार करता येणार नाही. ना इस्रायलचे सैनिक बफर झोन पार करू शकणार, ना पॅलेस्टाईनचे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दिला इशारा?
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "मला आशा आहे की, आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक करार करणार आहोत. जर हमासने हा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर जे कायमस्वरुपी शक्य आहे, तोच हा प्लॅन आहे."
"इतर सर्वांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे. मला वाटते की, आपल्याला एक सकारात्मक उत्तर मिळेल. पण, जर असे झाले नाही, तर तुम्हाला कल्पना आहे की, बीबी (इस्रायलचे पंतप्रधान) यांना जे करायचे असेल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल", असा इशारा ट्रम्प यांनी हमासला दिला आहे.