'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:33 IST2025-10-26T10:32:38+5:302025-10-26T10:33:12+5:30
Trump On Russian Oil: ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
Trump On Russian Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा एकदा दावा केला की, भारतानेरशियाकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिका आणि भारतातील रणनीतिक भागीदारीचा मोठा टप्पा असल्याचे म्हटले. मात्र भारताने तत्काळ या दाव्याला खोटे ठरवत स्पष्ट केले की, तेल खरेदी हा भारताचा राष्ट्रीय हितांवर आधारित स्वतंत्र निर्णय आहे आणि कोणत्याही बाह्य दबावापुढे भारत झुकणार नाही.
रशियन कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध
ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर Rosneft आणि Lukoil वर कठोर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादले आहेत.
#AUDIO | On his upcoming meeting with Chinese President Xi, US President Donald Trump says, "... I may be discussing it (purchase of Russian oil)... China's cutting back very substantially on the purchase of Russian oil, and India's cutting back completely, and we've imposed… pic.twitter.com/1DBGw8LT3S
— ANI (@ANI) October 25, 2025
या निर्बंधांनुसार:
अमेरिकेत या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तांना फ्रीज केले जाईल, अमेरिकन नागरिकांना त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई असेल, आणि जागतिक भागीदार देशांनाही या कंपन्यांपासून व्यावसायिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेचा दावा आहे की, या दोन कंपन्या मिळून रशियाच्या सुमारे 45 टक्के तेल निर्यातीवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच या पावलामुळे रशियन ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होईल.
भारताची ठाम भूमिका
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरू ठेवणार आहे. जोपर्यंत संयुक्त राष्ट्र स्तरावर अधिकृत निर्बंध लागू होत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश भारताला कोणत्या देशाकडून तेल घ्यायचे, हे ठरवू शकत नाही. ऊर्जा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भारतासाठी स्वस्त आणि स्थिर तेल पुरवठा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आपल्या ऊर्जा सुरक्षेवर तडजोड करू शकत नाही.