"ट्रम्प यांची हत्या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:23 IST2025-01-23T09:22:31+5:302025-01-23T09:23:17+5:30
...तर त्यांना देशाच्या 'डीप स्टेट'कडून लक्ष्य केले जाऊ शकते. ट्रम्प यांची हत्या होऊ शकते. असा इशारा दुगिन यांनी दिला आहे.

"ट्रम्प यांची हत्या होऊ शकते...", रासपुतिन यांचा इशारा; तज्ज्ञ म्हणाले, "रशियाची शकलं उडतील"!
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच, रशियाला युक्रेनसोबतचे युद्ध थांबण्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. याच बरोबर, जर रशियाने असे केले नाही, तर त्याच्यावर विविध निर्बंध लादण्याची उघड धमकीही त्यांनी दिली आहे. यानंतर आता, पुतिन यांचे ब्रेनन म्हणून ओळखले जाणारे, 'रसपुतिन' अर्थात अलेक्झँडर दुगिन यांनी म्हटले आहे की, "जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची माहिती सार्वजनिक केली, तर त्यांना देशाच्या 'डीप स्टेट'कडून लक्ष्य केले जाऊ शकते. ट्रम्प यांची हत्या होऊ शकते. असा इशारा दुगिन यांनी दिला आहे.
ट्रम्प यांच्यासाठी घातक ठरेल 'हा' निर्णय -
६३ वर्षीय अलेक्झॅडर दुगिन म्हणाले, "केनेडी यांच्या हत्ये संदर्भातील कागदपत्रे उघड करण्याचा ट्रम्प यांचा निर्धार त्यांच्या साठीच धोक्याचा आहे. मला वाटते की ट्रम्प यांचा तीव्र विरोध होईल. त्यांच्या हत्येचाही प्रयत्न होऊ शकतो अथवा दहशतवादी हल्लाही होऊ शकतो. अमेरिकेत सामाजिक अशांतता पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी ती अद्याप सुरू झालेली नसली तरीही. पण हे सर्व शक्य आहे."
ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, "जर पुतिन यांनी युद्ध थांबवले नाही, तर ते स्वतःच्याच हातांनी रशियाचा सर्वनाश करतील. कारण पुतिन यांनी तडजोड केली नही, तर रशिया मोठ्या संकटात सापडेल. या युद्धामुळे रशियन अर्थव्यवस्थाही बुडत आहे आणि महागाई अजूनही एक मोठा धोका आहे. याशिवाय, इतरही अनेक धोके आहेत."
...तर रशियाचे पतन निश्चित -
ट्रम्प यांच्या या विधानावर लष्करी तज्ञही सहमत असल्याचे दिसून येते. युरोपत अमेरिकेच्या सैन्याचे कमांडर म्हणून काम केलेले निवृत्त जनरल बेन हॉजेस देखील रशिया विनाशाच्या मार्गावर असल्याचे मानत आहेत. जर त्याचे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही, तर त्याचा पतन निश्चित आहे. तसेच, रशियातील सध्यस्थिती पाहता, जगाने आण्विक अराजकतेसाठी तयार राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अचानकपणे पतण होईल -
द यूक्रेनियन रिव्ह्यूला दिलेल्या मुलाखतीत होजेस म्हणाले, "रशियाचे पतनही सोव्हिएत युनियनच्या पतनासारखेच अचानकपणे होऊ शकते. तेव्हाही यासाठी कुणीही तयार नव्हते. रशियन संघही त्याच पद्दतीने कोसळत आहे आणि कोणत्याही क्षणी पूर्णपणे कोसळू शकते. अशा परिस्थितीत जगाला अण्वस्त्रांसंदर्भात विचार करावा लागेल. तेल आणि गॅससह सर्व संसाधनांवर कुणाचे नियंत्रण असेल? यावरूनही गोंधळ उडेल. याशिवाय, त्याच वेळी, रशियन संघातील काही भागांची स्वतंत्र राहण्याची इच्छा असेल. तर काहींना मॉस्कोसोबत राहण्याची इच्छा असेल. आता, याला कसे संपवायचे आहे, याचा विचार आपण करायला हवा."