ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:28 IST2026-01-05T09:27:53+5:302026-01-05T09:28:07+5:30
Trump Welfare List India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत सरकारी मदत घेणाऱ्या स्थलांतरितांच्या देशांची यादी जाहीर केली आहे.

ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज निर्णयांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रंप यांनी 'ट्रुथ सोशल'वर अशा देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्या देशांतून आलेले स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सरकारी मदतीवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे, या यादीत भारताच्या शेजारील देशांची नावे झळकत असली तरी, भारताचे नाव मात्र या यादीत कुठेही नाही.
काय आहे ही 'वेलफेअर लिस्ट'?
डोनाल्ड ट्रंप यांनी 'Immigrant Welfare Recipient Rates by Country of Origin' या शीर्षकाखाली सुमारे १२० देशांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ही यादी अशा देशांची आहे ज्यांचे नागरिक अमेरिकेत आल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याऐवजी अमेरिकन सरकारच्या अन्न, आरोग्य आणि आर्थिक मदत योजनांचा सर्वाधिक लाभ घेतात.
शेजारील देशांची स्थिती काय?
ट्रंप यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे शेजारील देश अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असल्याचे दिसून येते:
भूतान: ८१.४% (सर्वात जास्त मदत घेणारा देश)
बांगलादेश: ५४.८%
पाकिस्तान: ४०.२%
नेपाळ: ३४.८%
चीन: ३२.९%
याउलट, या यादीत भारताचे नाव नसणे हे सिद्ध करते की अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक हे सरकारी मदतीवर अवलंबून नसून ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे महत्त्वाचे घटक आहेत.
भारताचे नाव का नाही?
प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, भारतीय अमेरिकन समुदाय हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि उच्चशिक्षित समुदायांपैकी एक आहे. भारतीय कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे १,५१,२०० डॉलर्स आहे, जे इतर कोणत्याही स्थलांतरित समुदायापेक्षा कितीतरी जास्त आहे. बहुतांश भारतीय हे आयटी, औषधनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे भारतीय नागरिकांना सरकारी मदतीची गरज भासत नाही.
ट्रंप यांचा संदेश
ही यादी प्रसिद्ध करण्यामागे ट्रंप यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांना अमेरिकेच्या इमिग्रेशन सिस्टीममध्ये बदल करायचे असून, जे देश अमेरिकेवर आर्थिक भार टाकत आहेत त्यांच्यावर निर्बंध आणण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भारताचे नाव यातून वगळले जाणे ही जागतिक स्तरावर भारतीय समुदायाची मोठी प्रतिमा उंचावणारी बाब मानली जात आहे.