हमासच्या गोळीबारातून वाचला, पण आठवणींनी जीव घेतला! प्रेयसीच्या मृत्यूनंतर इस्रायली तरुणाने कारसह स्वतःला पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:03 IST2025-10-13T12:02:58+5:302025-10-13T12:03:39+5:30
हमासने केलेल्या हल्ल्यात प्रेयसीचा मृत्यू झाल्याने इस्रायली तरुणाने आत्महत्या केली.

हमासच्या गोळीबारातून वाचला, पण आठवणींनी जीव घेतला! प्रेयसीच्या मृत्यूनंतर इस्रायली तरुणाने कारसह स्वतःला पेटवले
Hamas Attack: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धातील नरसंहाराचा परिणाम अजूनही काही लोक भोगताना दिसत आहेत. तीन वर्षापूर्वी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी अनेकांचे अपहरण केलं होतं. यातील काहींची हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केली तर काहींना सोडून दिलं होतं. नोव्हा ओपन-एअर म्युझिक फेस्टिव्हल आणि आजूबाजूच्या परिसरात या दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये ३७८ लोक मारले गेले. या हत्याकांडातून वाचल्यानंतर दोन वर्षांनी एका इस्रायली व्यक्तीने आत्महत्या केली. कारण हमासच्या हल्ल्यात त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधील भीषण हत्याकांडाचे भयावह अनुभव विसरु न शकलेल्या एका इस्रायली तरुणाने नुकतीच आत्महत्या केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात प्रेयसीला डोळ्यासमोर गमावणाऱ्या रोई शालेव या तीस वर्षीय तरुणाने स्वतःला संपवल्याने खळबळ उडाली आहे.
नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या काही दिवसांतच रोई शालेव याने आपले जीवन संपवले. तेल अवीव येथे तो आपल्या जळत्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला. आत्महत्येपूर्वी काही तास त्याने सोशलएक हृदयद्रावक मेसेज पोस्ट केला होता. "माझ्यावर रागावू नका. कोणीही मला कधीच पूर्णपणे समजून घेणार नाही, आणि ते ठीक आहे. मला फक्त हे दुःख संपवायचे आहे. मी जिवंत आहे, पण आत सर्व काही नाही," असं यामध्ये म्हटलं होतं. काही तासांनंतर, तो तेल अवीवमध्ये त्याच्या जळत्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच दिवशी तो कॅनमधून इंधन खरेदी करताना दिसला होता.
७ ऑक्टोबरच्या भीषण हत्याकांडाच्या दिवशी, रोई आणि त्याची प्रेयसी मपल ॲडम गाझा पट्टीजवळील रेईम येथे असलेल्या नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये होते. दहशतवादी हल्ला सुरू झाल्यावर जीव वाचवण्यासाठी रोई, मपल आणि त्यांचा एक जवळचा मित्र कारखाली लपले. रोईने मपलला वाचवण्यासाठी तिच्या अंगावर पडून मृत असल्याचे नाटक केले, पण या गोळीबारात ते दोघेही जखमी झाले आणि मपलचा जागीच मृत्यू झाला.
रोईने आपल्या डोळ्यासमोर प्रेयसीला मरताना पाहिले. या घटनेमुळे त्याला तीव्र मानसिक आघात झाला. तो या आघातातून कधीही सावरू शकला नाही. या दु:खद घटनेमुळे नोव्हा हल्ल्यातून वाचलेल्या इतर हजारो लोकांच्या मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. युद्धामुळे केवळ प्रत्यक्ष बळीच नव्हे, तर वाचलेल्यांवर होणारा मानसिक आघात किती गंभीर असू शकतो, हे रोई शालेवच्या आत्महत्येमुळे स्पष्ट झाले आहे.