Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:05 IST2025-10-04T18:03:03+5:302025-10-04T18:05:20+5:30
Pakistan School Bomb Blast News: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील खैबर जिल्ह्यातील जमरुद तहसीलमध्ये एका खासगी शाळेत बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील खैबर जिल्ह्यातील जमरुद तहसीलमध्ये एका खासगी शाळेत बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या या परिसरात झालेल्या स्फोटात चौथी इयत्तेतील चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी पेशावरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना मोठ्या इजा न झाल्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चौथी इयत्तेतील एका विद्यार्थ्याला शाळेत जात असताना रस्त्यावर खेळण्यासारखी एक वस्तू दिसला. त्या वस्तूला खेळणी समजून तो शाळेत घेऊन गेला. परंतु, वर्गात पोहोचताच, त्या विद्यार्थ्याच्या हातून तो बॉम्ब जमिनीवर पडला आणि त्याचा मोठा स्फोट झाला. या घटनेत चार विद्यार्थी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील संभाव्य धोके टाळण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. या स्फोटाच्या घटनेने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्फोटकांच्या धोक्याची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित केली. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बाजौर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती, ज्यात चार मुले मृत्युमुखी पडली होती, आणि दोन मुले गंभीरपणे जखमी झाली होती.