चिली हादरलं! सॅंटियागोमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:51 IST2026-02-21T14:50:17+5:302026-02-21T14:51:00+5:30

Chile Tanker Explosion: चिलीची राजधानी सॅंटियागो मध्ये गॅस वाहून नेणारा टँकर उलटून झालेल्या शक्तिशाली स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tragedy in Chile: 4 Dead, 17 Injured as Gas Tanker Flips and Explodes in Santiago | चिली हादरलं! सॅंटियागोमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

चिली हादरलं! सॅंटियागोमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

चिलीची राजधानी सॅंटियागोमध्ये गुरुवारी एका गॅस टँकरचा भीषण अपघात होऊन झालेल्या स्फोटात किमान ४ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये टँकर चालकाचाही समावेश आहे. हा अपघात इतका भयानक होता की, स्फोटाचे हादरे २०० मीटरपर्यंत जाणवले. या स्फोटात तब्बल ५० वाहनांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी उत्तर सॅंटियागोमधील रेन्का येथील औद्योगिक क्षेत्राजवळ हा अपघात घडला. गॅस्को या स्थानिक कंपनीचा गॅसने भरलेला टँकर एका ओव्हरपासखालून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर आधारस्तंभाला धडकून उलटला.

टँकर उलटल्यानंतर गॅस वेगाने बाहेर पडू लागला. अवघ्या काही सेकंदात या गॅसचे रूपांतर पांढऱ्या ढगात झाले आणि संपूर्ण रस्ता धुक्यासारख्या ढगाने व्यापला गेला. त्यानंतर अचानक एक मोठा स्फोट होऊन परिसरात आगीच्या ज्वाळा पसरल्या. स्फोटामुळे लागलेल्या आगीत रस्त्यावरील सुमारे ५० वाहने जळून खाक झाली किंवा त्यांचे नुकसान झाले. १७ जखमींपैकी ५ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सॅंटियागोचे गव्हर्नर क्लॉडिओ ओरेगो यांनी सांगितले की, एका व्यक्तीचे शरीर १०० टक्के भाजले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गॅस गळतीनंतर परिसरात दाट पांढरे धुके पसरले होते, ज्याने रस्त्यावरील कार आणि इतर वाहनांना वेढले होते. कोणाला काही समजण्याच्या आतच मोठा आवाज झाला. स्फोटाचे हादरे १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत जाणवले. प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Tragedy in Chile: 4 Dead, 17 Injured as Gas Tanker Flips and Explodes in Santiago